DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: सुनील कांबळे
वसई : नायगाव परिसरात हत्या करून फेकलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. वेगात तपास करत 48 तासात हत्याकांडाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच पतीची सुपारी देऊन त्याचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह सुपारी घेणाऱ्या जोडप्याला अटक केली आहे. कमरूददिन मोहम्मद उस्मान अन्सारी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आशिया अन्सारी असे आरोपी पत्नीचे नाव असून, बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि सोफिया बिल्ला पठाण अशी अन्य आरोपींची नावे आहे. वसई गुन्हे शाखा कक्ष 2 च्या टीमने या हत्येचा उलगडा केला आहे.
नायगाव परिसरात 27 जानेवारी रोजी रस्त्याच्या कडेला एक अनोळखी मृतदेह पोलिसांना आढळला होता. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांनी सदर वर्णनाच्या व्यक्तीसंदर्भात कुठे मिसिंग तक्रार नोंद आहे का तपासले. तपासादरम्यान पोलिसांना गोरेगाव येथील बांगुरनगर पोलीस ठाण्यात एका इसमाची मिसिंग तक्रार दाखल असल्याचे कळले.
पोलिसांनी चौकशी केली असता सदर मृतदेह त्याच मिसिंग व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मृतदेहाची ओळख पटली. पोलिसांनी बांगुरनगर परिसरात व्यक्तीची चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान अन्सारीच्या शेजारी राहणारे जोडपेही गायब असल्याचे कळले.
पोलिसांना गायब झालेल्या जोडप्यावर संशय आल्याने त्यांचा शोध सुरु केला. जोडप्याला अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता सर्व प्रकार उघडकीस आला.
मयत अन्सारीची पत्नी आशिया हिचे कंपनीत सोबत काम करणाऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधात पती अडथळा ठरत असल्याने तिने शेजारी राहणाऱ्या बिलाल उर्फ मुल्ला निजाम पठाण आणि सोफिया बिल्ला पठाण यांना हत्येची सुपारी दिली.
पतीची हत्या करण्यासाठी आशियाने एक लाख रुपये देऊ केले होते. यापैकी 20 हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले होते. पोलिसांनी तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.