DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री:- आगामी गणेशोत्सव गणेश मंडळांनी सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अनील बागुल यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे असेही आवाहन उपविभागीय अधिकारी संजय भांबळे यांनी यावेळी केले.
साक्री पोलीस ठाण्यात गणेश मंडळ व पत्रकार बंधू यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना उपविभागीय अधिकारी संजय भांबळे व प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांच्या वतीने गणेश मंडळाच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये मुख्यतः विजेची समस्या, वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे वृक्षाच्या फांद्या, विजेचे तारे, नदीकाठी विजेचा प्रकाश त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावू व तसेच त्यांच्याशी पत्रव्यवहार करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले व तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडूनही काही सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांतून एकतेचा संदेश,महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत.
गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. तसेच, जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करावे. त्यासोबतच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे. या तिन्ही गोष्टींसाठी मंडळांना सर्वतोपरी मदत करू व तसेच कायद्याचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांचा आम्ही मान सन्मान करू अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.
गणेश मंडळांनी नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. मंडळांनी महिलांची सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी उत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सजग रहावे, अशा सूचना ही यावेळी साक्री पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या.
गणेशोत्सवासाठी साक्री पोलीस स्टेशनने नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी व्यक्त केले या वेळी विभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे, प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ, पोलीस कर्मचारी, पत्रकार बंधू, गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.