मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड राहिलेल्या जितेंद्र शिंदे याचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जितेंद्र शिंदेची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विनापरवानगी दुबई आणि सिंगापूरला गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीच्या नावे सुरक्षा कंपनी स्थापन केल्याचाही शिंदेवर आरोप आहे. जितेंद्र शिंदे मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबलपदावर कार्यरत होता. 2015 पासून तो बिग बी अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून नियुक्त होता. शिंदेला अमिताभ बच्चन यांच्याकडून वार्षिक अंदाजे दीड कोटी रुपये मिळत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती.
अमिताभ बच्चन यांना एक्स (X) दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे दोन कॉन्स्टेबल कायम त्यांच्यासोबत तैनात असतात. जितेंद्र शिंदे रितसर अर्ज करुन किंवा आपल्या वरिष्ठांना न सांगता चार ते पाच वेळा दुबई आणि सिंगापूरला गेल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर त्याने सुट्टीवर बाहेर जाताना खोटी माहिती दिली होती. चौकशीमध्ये दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
बदलीनंतरही चर्चा
गेल्या वर्षी ऑगस्ट महिना अखेरीस जितेंद्र शिंदेची डीबी मार्ग पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली होती. शिंदे कमाईसाठी आणखी कोणता स्रोत वापरत होता का, हे तपासण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बदली केल्याची चर्चा होती. मात्र पोलिस आयुक्तांनी पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी सेवा बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. त्यातून ही बदली झाल्याचा निर्वाळा त्यावेळी देण्यात आला होता.
अमिताभ बच्चन यांचा वैयक्तिक सुरक्षारक्षक
जितेंद्र शिंदेची अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडे 2015 पासून सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. अनेक कार्यक्रमांमध्ये शिंदे बच्चन यांचा बॉडीगार्ड म्हणून वावरतानाचे त्याचे फोटोही समोर आले होते. चित्रपटांच्या शूटिंगपासून केबीसीचा सेट आणि प्रमोशनसाठी जितेंद्र शिंदे जातीने हजर असायचा. या काळात बच्चन यांच्याकडून दरवर्षी अंदाजे दीड कोटी रुपये मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. जितेंद्र शिंदेच्या पत्नीच्या नावे एक सिक्युरिटी एजन्सी असल्याचाही आरोप आहे. त्यात जितेंद्र पैसे गुंतवत असल्याचाही दावा केला जातो.