DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – अकिल शहा
साक्री : नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरती कोंडाईबारीकडून साक्रीकडे लाकुड घेऊन जाणारा ट्रक जात होता. या ट्रकला कोंडाईबारी वनविभागाच्या पथकाने 5 ते 6 किमी पाठलाग करीत पकडले. या कारवाईत ट्रकसह 10 लाख 87 हजार 148 रुपये किंमतीचे लाकुड जप्त करण्यात आले. वनविभागाने अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
कोंडाईबारी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता दिलीप सोनवणे आणि वन कर्मचाऱ्यांसह गुरुवारी मध्य रात्री गस्त घालत होते. त्यांना ट्रकमधून (एम.एच. 14, ए.एच. 6516) लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय आला. वन विभागाच्या पथकाने ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक थांबला नाही. यामुळे पथकाने 5 ते 6 कि.मी.पर्यंत ट्रकचा पाठलाग करीत पकडला. ट्रक चालक आणि सहचालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले. ट्रकच्या मागील बाजूस तांदळाचा (भुसा) भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. गोण्यांच्या आत खैर जातीचे लाकूड ट्रकमध्ये भरलेले आढळून आले. ट्रक आणि खैर प्रजातीचे लाकडा सह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लाकडाची किंमत अंदाजे दोन लाख 87 हजार 148 रुपये आहे, तर वाहनाची किंमत अंदाजे आठ लाख रुपये असा एकुण दहा लाख 87 हजार 148 रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपवनरक्षक नितीनकुमार सिंग , दक्षता पथकाचे वनअधिकारी आर. आर. सदगिर, सहाय्यक वनरक्षक डी.आर.अडकिणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडाईबारी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.