DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- विजय सनदी
चंदगड : चंदगड तालुका हा मागास, डोंगराळ म्हणून ओळखला जातो. जलद वाहतुकीसाठी रस्त्यांचा वानवा असल्याने व तालुकास्तरीय बोगस डॉक्टर समितीच्या अकार्यक्षम व ढिसाळ कारभारामुळे तालुक्यात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसविले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने बोगस डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु केल्याचे चित्र दिसत आहे.
ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसवून जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडला असून त्यांचा खुलेआम गोरख धंदा सुरु आहे. थातूर मातुर वैद्यकीय सेवेचा अनुभव, कंपाऊंडरच झाले डॉक्टर अशी परिस्थिती असल्याने गोर गरीब, कामगार, शोषित, पिढीत लोकांना तालुक्यात कोणी वाली आहे का ? असा प्रश्न सामान्य लोकांना पडला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावर यांनी जिल्हातील बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिलेले असताना जिल्हा व तालुकास्तरीय वैद्यकीय अधिकारी कारवाई करण्यासाठी पुढे येत नाहीत. तक्रार केली तरच आरोग्य विभाग तपासणीसाठी पुढे येतो, मात्र गाव व तालुका पातळीवर आरोग्य समिती, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून प्रत्येक गावात डॉक्टरांची पदवी, नोंदणी, याची कसून तपासणी करणे आवश्यक असून गाव पातळीवर बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
तालुकास्तरीय आरोग्य समितीने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास चंदगड तालुक्यात या बोगस डॉक्टरांच्या विरोधात जनआंदोलन उभारणार असल्याचे सामजिक कार्यकर्ते संदीप सकट यांनी म्हटले आहे.