——————————————————– सुतारवाडी :- दि. 15 (हरिश्चंद्र महाडिक)गेल्या दोन महिन्यांपासून अंगात हुडहुडी भरेल एवढी थंडी जाणवत होती. शेकोटी शिवाय पर्याय नव्हता. या मौसमात स्वेटरची मोठ्या प्रमाणापूर विक्री झाली. गेल्या आठवड्यापासून थंडी कमी होऊ लागली आहे. परंतु धुक्याची तिव्रता तशीच जाणवत आहे. कालवा किंवा छोटी नदी वाहत आहे अशा परिसरात मोठ्या प्रमाणावर सकाळी धुके पसरलेले दिसत आहे. या धुक्यामुळे वाहन चालकांना पुढचे दिसणे अशक्य झाल्याने वाहनांचा वेग अगदी कमी ठेवावा लागत आहे. कोलाड जवळील चिंचवली येथे पाण्याचा कालवा आहे. या कालव्याच्या पाण्यामुळे या परिसरात धुक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. काही दिवसांपुर्वी दोन वेळा पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे थंडीच्या दिवसात उत्तम प्रकारे मिळणारी कडधान्ये यांचे खूपच नुकसान झाले आहे. दरवर्षी सावरवाडी, धगडवाडी या परिसरामध्ये कलिंगड, शिराळी यांची काही प्रमाणावर लागवड केली जात होती. या वर्षी तुरळक प्रमाणात लागवड केलेली दिसत आहे. सध्या पावसाचे काही खरे नसते. लहरी पाऊस केव्हाही पडतो आणि पिकांचे नुकसान करतो. त्यामुळे शेतकरी आता सावधपणे लागवड करत आहे. सध्या थंडीचे प्रमाण कमी होत चालले असून सकाळी 11 नंतर उष्मा जाणवत आहे.