नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाइम

संपादकीय…………..

दि. 03/07/2023

सावध ऐका पुढल्या हाका!

जे कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या लढाईमधील खलनायक होते आज ते आपले खलत्व नष्ट करून भ्रष्टाचार विरोधी लढाईत नव्या दमाने सामील झाले आहेत.

‘लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठी सक्षम विरोधी पक्ष असणे ही प्रगल्भ लोकशाहीची गरज आहे’ या वाक्यात फक्त चिक्कार आदर्शवाद भरला आहे याचा प्रत्यय आज येण्याचे कारण म्हणजे शुक्रवार संध्याकाळ पर्यंत विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह आज शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. आता संख्यात्मक दृष्ट्या पाहता हे सरकार अधिक मजबूत झाले असे म्हणण्यास हरकत नाही. पण राजकारणात जे दिसतं ते तसच असतं असं म्हणण्याचे धारिष्ट्य जुने लोक काय तरुण देखील म्हणणार नाही. कारण २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात इतके डाव खेळले गेले की आता प्रत्येक जण राजकीय विश्लेषक होण्यास पात्र आहे.
सध्या जे काही सुरु आहे ते जनता हताशपणे बघते आहे कारण भाजप शिवसेनेला २०१९ मध्ये जनतेने कौल दिला तेव्हापासून आजवर जनतेच्या कौल दिल्याप्रमाणे ना काही राजकारणात घडतं आहे ना जनतेला अभिप्रेत असणारी विकासकामे होता आहेत. तरी आज उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शपथ घेतल्यावर जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सत्तेत येण्याचा निर्णय घेतला असे सांगत किमान जनतेची आठवण ठेवली यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
आता इतकं मोठ बहुमत आणि सर्व मातब्बर मंडळी मंत्रीमंडळात असल्यावर विकासाची गंगा दुथडी भरून वाहायला हवी पण त्यावर विश्वास कोण ठेवेल? राजकारणात आता सत्ता प्राणवायू एवढी महत्त्वाची ठरली आहे, तेव्हा असले प्रयोग माध्यमक्रांतीच्या सहाय्याने घरबसल्या
पाहण्याचे भाग्य जनतेच्या भाळी उरले आहे. राज्याचा विरोधी पक्ष नेता शुक्रवारी आपला राजीनामा देतो याची कुणकुण रविवारी देखील माध्यमांना लागत नाही. विधानमंडळ कार्यालय ते सांगत नाही, अजित पवारांना ते जनतेला सांगत बसावं वाटत नाही. इतकं जनतेला गृहीत धरल्यावर माध्यमांत जे काही दिसतं आहे ते खर कसं म्हणावं? की ते जे काही दाखवू इच्छितात ते आपण बघतो आहे याचे विश्लेषण केले जाणे आवश्यक ठरते. अजित पवारांच्या सोबतीला हसन मुश्रीफ यांनी देखील शपथ घेतली. जे कालपर्यंत भ्रष्टाचाराच्या लढाईमधील खलनायक होते आज ते आपले खलत्व नष्ट करून भ्रष्टाचार विरोधी लढाईत नव्या दमाने सामील झाले आहेत. त्यांच्या विरोधात काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी लाटल्या
या संदर्भात इडी कारवाई दरम्यान तक्रारी केल्या होत्या. माध्यमांत त्याचा अपेक्षेप्रमाणे फार बोभाटा झाला नाही पण आज त्या शेतकऱ्यांना आपण फसवलो गेलो असल्याची भावना मनात असेल ती महाराष्ट्राची प्रातिनिधिक भावना आहे.
आज जिंकलं कोण तर अर्थात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी कारण त्यांना जे हवं आहे ते साध्य करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. जर कुणाला यांत साधनशुचितेचा अभाव वगैरे वाटत असेल तर ती साधनशुचिता कुठल्या पक्षाच्या दाराशी बांधली आहे याचा शोध घ्यावा. थोडक्यात जे काही घडलं ते चीड आणण्यासारख आहे. मात्र यामुळे उरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सहानुभूती मिळेल असं काही नाही. कारण हा खेळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यापूर्वीच खेळलेले आहेत. तेव्हा नैतिकता वगैरेची भाषा राजकारणात काय राजकीय विश्लेषणात देखील शोभत नाही असे म्हणणे वावगे नसावे.
या सत्तानाट्याचा ताजा अंक बघितला तर त्यांत शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली ती चाणाक्ष लोकांच्या नजरेतून सुटणार नाही. शरद पवार ज्या धीराने पत्रकार परिषदेला सामोरे गेले आणि एकंदरच त्यांची देहबोली आणि विषयाची मांडणी यांतून तरुण राजकारण्यांना काही शिकता येईल असा धडा त्यात होता. घडलेल्या घटनांची मुद्देसूद मांडणी करत कुठलाही अभिनिवेश न दाखवता आणि कुठल्याही प्रश्नाला बगल न देता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यादरम्यान त्यांनी दाखवलेली परिपक्वता आणि संयम सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातून जणू बाद झाला आहे. विरोधकांचा समाचार घेतांना त्यांची असलेली संयमी भाषा आणि उच्च अभिरुची असलेला विनोद इतकं सर्व काही त्या पत्रकार परिषदेत होत. त्याउलट उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षफुटी दरम्यान केलेली बोंब किती उथळ होती याची जाणीव यांतून व्हावी. अर्थात ही झाली शरद पवारांची सकारात्मक बाजू पण मुलीच्या प्रेमापोटी आज त्यांना हा दिवस बघावा लागतो आहे का हा प्रश्न ना त्यांना विचारला गेला ना त्यांनी त्याबद्दल काही मत दर्शवले. पण याची जाण या मुरब्बी नेत्याला नसेल? कदाचित ही बाब त्यांच्या राजकारणाची मर्यादा असेल. आजवर त्यांनी देखील अनेक वार-पलटवार केले आज एक घाव त्यांना बसला आहे. पण त्यांचा पुन्हा उभं राहण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात रंग भरेल यांत शंका नाही.
२०२४ ला निवडणुका लागतील तोपर्यंत हे गढूळ झालेलं वातावरण शांत झालेलं असेल आणि हे नेते पुन्हा एकदा जनतेच्या दारात असतील तोपर्यंत या नाट्याला अंत नाही. अजून किती अंक पाहावे लागतील याची माहिती कुणाला नाही मात्र तोपर्यंत सावध ऐका पुढल्या हाका हा बाणा जागृत ठेवणे ओघाने आलेच.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
7:59 am, December 23, 2024
19°
साफ आकाश
Wind: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!