नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाइम
संपादकीय…………….
दि. 14/08/2023

कशासाठी…? चांगल्या उद्यासाठी….!



*जमेच्या म्हणता येतील अशा अनेक बाजू आपल्याकडे आहेत हे तेव्हा प्रकर्षाने लक्षात येते जेव्हा आपले शेजारी देश अनेक आव्हानांना तोंड देता आहेत.*

वर्तमानपत्रातील अग्रलेख म्हणजे जनतेच्या बाजूने समोरच्यावर ताशेरे ओढलेले असतात. परखड मत मांडलेले असते आणि शहाजोगपणाचे सल्ले देखील दिले जातात. परंतु असेही काही दिवस असतात जेव्हा आजूबाजूला इतका सगळा काही कल्लोळ सुरु असला तरी देखील घडलेल्या घटनांचे सिंहावलोकन करत भविष्याबद्दल आशादायी चित्र रंगवावेसे वाटते. कारण वर्षानुवर्षे हा अट्टहास त्यासाठीच चाललेला असतो. अनेकजण जे काही वाईट सुरु आहे त्याविरोधात ठामपणे उभे राहतात. त्यामागे काही वैयक्तिक स्वार्थ नसतो तर समाजाप्रती काही तरी करण्याची वृत्ती असते. कारण आजपेक्षा उद्याचा दिवस अधिक चांगला असावा अशी आशा त्यामागे असते.

भारताचा येता स्वातंत्र्यदिन आपण साजरा करू तेव्हा देखील भविष्याबद्दल अनेक कल्पना आपल्या मनात असतील आणि ते पूर्ण करण्याचा आपला संकल्प दृढ असेल तर त्या केवळ कल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरतील. जमेच्या म्हणता येतील अशा अनेक बाजू आपल्याकडे आहेत हे तेव्हा प्रकर्षाने लक्षात येते जेव्हा आपले शेजारी देश अनेक आव्हानांना तोंड देता आहेत. अर्थात आपल्याकडे नवीन काही करण्याचे उरले नाही असे नव्हे अजून तर खूप मोठा पल्ला गाठला जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी देखील अविरत कष्टांची गरज असणार आहे. मात्र आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत यांवर देशवासीयांच्या मनात शंका नाही याचे निदर्शक म्हणजे त्यांचा लोकशाहीवर असलेला दृढ विश्वास होय. आपल्यासाठी “लोकशाही” हे एक सर्वोच्च मूल्य आहे. मात्र त्याला नख लागणार नाही याकडे आपले सदैव लक्ष असायला हवे. अन्यथा या मिळवलेल्या स्वातंत्र्याचे मोल आपण लवकरच गमावून बसू.

सध्या चांगल्या दराने आपण विकास करत आहोत. तंत्रज्ञान क्षेत्रात देखील आपण चांगली भरारी घेतली आहे. माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण या क्षेत्रात आपला दबदबा कायम आहे. यासोबत कृषी, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण या क्षेत्रात भरीव करता येण्यासारखे बरेच काही आहे. त्यादृष्टीने प्रयत्न देखील होतांना दिसतात मात्र हे क्षेत्र म्हणजे भविष्यातील संधी आहेत. थोडक्यात काय तर आपण ज्याला विकास असे म्हणत आहोत ते म्हणजे आपण भौतिकदृष्ट्या चांगल्या गतीने प्रगती करत आहोत.

जागतिक दर्जाला साजेसं असं काही निर्माण करण्याची क्षमता असण हे आपले सध्याचे यश आहे. त्यासाठी वैज्ञानिक ते अभियंता आणि शिक्षक ते प्रशासक यांपर्यंत अनेकांचे हात यासाठी निर्णायकपणे कार्यरत आहेत म्हणून हे शक्य झाले. समजात सर्जनशीलतेचे स्वागत होते आहे, नव्या वाटा आपल्याला गवसत आहेत. या तऱ्हेने आपण आपल्या सर्वांगीण विकासाचे प्रारूप तयार केले आहे. मात्र असे असले तरी न्यून म्हणावे असे बरेच काही आहे. ज्याचा विचार करणे देखील समयोचित आहे. कारण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा नेण्याचे स्वप्न आपल्या देशातील धुरीणांनी बघितले. त्यासाठी आपले आयुष्य अनेकांनी पणाला लावले. तेव्हा जर आपली पुढे जाण्याची दिशा ठरली आहे तर त्यातील खाचखळगे माहित असणे आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ओघाने आलेच.

७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतांना आपल्या पुढे उभी असलेली आव्हाने अनेक आहेत. काही देशाबाहेरची आहेत तर काही देशांतर्गत आहेत. आपल्या देशात नागरिकांचे उत्पन्न पूर्वीच्या तुलनेत वाढले मात्र त्या प्रमाणात पुरेशा सुविधा आज देखील उपलब्ध नाही. पाणीपुरवठा, शिक्षण, रस्ते, सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात अजूनही ठोस करणे निकडीचे आहे. शिक्षण सर्वत्र उपलब्ध आहे पण त्याचा दर्जा वादातीत आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. जगाशी स्पर्धा करायची असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण ही काळाची गरज आहे. यांशिवाय कुपोषण ही आपली अद्यापही दुखरी नस आहे. जोपर्यंत आपण कुपोषणावर मात करत नाही तोपर्यंत भौतिक विकासाच्या चर्चा निरर्थक ठरतात याची आपण दखल घ्यायलाच हवी.

जमेच्या एवढ्या साऱ्या बाजू असतांना देखील उद्योगपूरक वातावरण निर्माण करण्यात देखील आपल्याकडून कसूर राहिलेली दिसते. एकीकडे पायाभूत सुविधांमध्ये वीज, रस्ते, वाहतूक आणि बंदरे याची क्षमता अजूनही पुरेशा प्रमाणात नाही. सध्या रस्त्यांचे जाळे आपण मोठ्या प्रमाणात निर्माण केले त्याचे श्रेय विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नक्कीच द्यावे लागेल. मात्र केवळ रस्ते निर्माण करून थांबता येणार नाही तर पायाभूत सुविधांचा यासाठी एकत्रितपणे विचार करून हे क्षेत्र अधिक गतिमान करणे आवश्यक आहे.

विकासाच्या वाटेवर जात असतांना आर्थिक विषमता ही देखील आपली एक समस्या आहे ज्याकडे डोळेझाक करणे आपल्या समतेच्या तत्त्वाला धरून होणार नाही. चौखूर प्रगती होत असतांना समाजातील एक मोठा हिस्सा जर या विकासाच्या फायद्यासून वंचित राहिला तर यांमुळे आपले अंतिमत: नुकसानच होणार आहे. तेव्हा शहरी-ग्रामीण, कुशल-निमकुशल, श्रीमंत-गरीब यांच्यातील वाढती दरी आपणांस परवडणारी नाही. हाच विचार कृषी क्षेत्रास देखील लागू होतो. समाजातील मोठा हिस्सा अद्याप देखील कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. तेव्हा आपल्या समोर असलेल्या आव्हानांकडे डोळसपणे बघून आपण आपली वाटचाल सुकर करायला हवी यासाठी हे सिंहावलोकन! दर्शन पोलीस टाईम परिवारातर्फे सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो….

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
8:10 am, December 23, 2024
20°
साफ आकाश
Wind: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!