*यश-अपयश हा विज्ञानातील प्रयोगांचा एक अविभाज्य असा भाग आहे, हे आपल्याला यानिमित्ताने जोखता आले.*
आपण अशा युगात आहोत की आपल्याकडे सतत बातम्यांचा ओघ सुरु असतो. गत आठवड्यात अशीच एक बातमी मात्र अब्जावधी भारतीयांच्या मनात घर करणारी ठरली ती म्हणजे भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी ठरली. चंद्रयान-३ च्या मोहिमेचा भाग असलेले “विक्रम” चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे अवतरीत झाले आणि समस्त भारतीयांनी एकच जल्लोष केला. या चंद्रयान मोहिमेची जी प्रमुख तीन उद्दिष्ट आहेत त्यातील पहिले उद्दिष्ट आपण गाठले आणि त्यानंतर “प्रज्ञान” रोव्हरने देखील चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत आपले उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. आता तिसऱ्या उद्दिष्टाकडे आपली वाटचाल सुरु झाली आहे ती म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांचे रासायनिक विश्लेषण करणे तसेच दगड, माती, विवरे यांच्या नोंदी घेऊन अभ्यास करणे यांसह अनेक वैज्ञानिक तपशीलांचा यांत समावेश आहे.
चंद्रयान-३ मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरला आहे. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावर आपल्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. इतकेच नव्हे तर आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवतरीत झाले. ही काही साधी बाब नव्हे! हे आजवर कुठल्याही देशाला साध्य झाले नव्हते. तेव्हा भारतीय अंतराळ संस्था असलेल्या ‘इस्रो’ च्या वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचण्याची जी किमया केली आहे त्याचे मोल मोठे आहे. इतर चंद्रमोहिमांपेक्षा आपली चांद्रमोहीम वेगळी कशी आहे त्याचे उत्तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचून आपण दिले आहे. चंद्राच्या या भागात महाकाय अशी विवरे आहेत. तेव्हा इथे यान उतरविणे इतके सोपे नाही. मात्र आपल्या वैज्ञानिकांनी हे साध्य केले. बर! विज्ञानामध्ये जी काही स्पर्धा असते ती काही “आपण कसे वेगळे” दाखविण्यासाठी नसते. आपण चंद्राच्या कठीण अशा दक्षिण ध्रुवावर उतरलो हा एक भाग झाला. पण पुढे काय? हा विज्ञानात सतत विचारला जाणारा प्रश्न इथेही आहेच आणि त्याचे उत्तर देखील तितकेच रंजक आहे. आजवर वैज्ञानिकांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. आपली चांद्रयान मोहीम या बर्फाचा पाठपुरावा करणार आहे. कारण जर हा बर्फ सापडला आणि बाहेर काढून वापरता आला तर पुढील अंतराळ मोहिमांसाठी एक नवे दालनच खुले होईल. बर्फ वितळवून आपण पाणी पिऊ शकतो, यानासोबत नेलेल्या उपकरणांच्या देखभालीसाठी पाणी आवश्यक असते शिवाय पाणी म्हणजे H2O मधील हायड्रोजन चा इंधन म्हणून वापर आणि श्वसनासाठी ऑक्सिजन असा वापर देखील होऊ शकतो. हे सगळ लगेच आवाक्यात येणार आहे का? आणि शक्य आहे का? याविषयी तूर्तास भाष्य करणे कठीण आहे. मात्र यातल्या शक्यता लक्षात घेतल्या तर आपल्या भविष्यातील अंतराळ मोहिमा किती आवाक्यात आल्या आहेत याची प्रचिती येते. सध्या हे सर्व जर-तर च्या स्तरावर असले तरी विज्ञान किती रंजक असू शकते याची कल्पना यावरून आपल्याला करता येते.
२३ ऑगस्ट च्या संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर जे वैज्ञानिक नाट्य आपण याची देही याची डोळा अनुभवले ते अविस्मरणीय आहे. आपल्याला माध्यमांमध्ये नाही तरी आपल्याला केवळ राजकीय नाट्य बघण्याची आणि वाचण्याची सवय असते मात्र भारतीयांनी ज्या उत्साहाने या वैज्ञानिक घटनेचे आकलन केले त्याकडे देखील लक्ष वेधणे गरजेचे आहे. कुणी असेही म्हंटले की, वैज्ञानिक आपली कामगिरी शांततेत पार पाडत असतांना एवढा गाजावाजा करण्याची गरज काय होती. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष प्रत्येक घटनेचा “उत्सव” करतो असा राजकीय कटाक्ष त्यामागे होता. मात्र जेव्हा आताचे लहान मुल-मुली यांनी हे चंद्रयान-३ मोहिमेचं यश अनुभवलं तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी विज्ञानाची रंजकता रुजली असेल. भविष्याचा विचार केला तर आपण त्यांना हे स्वप्न दाखवू शकलो हे आपले यश आहे आणि भविष्यातील वैज्ञानिक वाटचालीची बेगमी सुद्धा याद्वारे आपण करतो आहोत. तेव्हा दरवेळी प्रत्येक घटनेकडे केवळ राजकीय दृष्टीकोन ठेऊन बघणे योग्य नाही हे पण लक्षात घेणे जरुरी आहे. तेव्हा चंद्रावर सुरु असलेल्या वैज्ञानिक घडामोडींकडे लक्ष असल्याने पृथ्वीवर सुरु असलेलं हे राजकीय नाट्य फार काही टिकले नाही.
चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात हुकली होती. त्यातून धडा घेत आपण आज हे यश मिळवले आहे तेव्हा विज्ञान म्हणजे काय? त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता, चिकाटी याची चर्चा जर सामान्य करत असतील तर ती आपल्या देशासाठी सकारात्मक बाब आहे. इतकेच काय चंद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी होण्याच्या काही दिवस आधीच रशियाची लुना-२५ ही चंद्र मोहीम अपयशी ठरली. एरवी समाजमाध्यमांत खिल्ली उडवली जाणे सारखे प्रकार आपण नेहमीच बघतो परंतु यावेळी मात्र भारतीयांनी या घटनेकडे तितकेच गंभीरपणे पाहिले जे वैज्ञानिक घडामोडीत अपेक्षित आहे. याला आपली वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवण म्हणायचे की रशियाशी आपले असलेले चांगल्या संबंधांचा परिपाक म्हणायचा हे जो तो आपल्या चष्म्याने बघेल परंतु ही सकारात्मकता नोंद घेण्याजोगी आहे. यश-अपयश हा विज्ञानातील प्रयोगांचा एक अविभाज्य असा भाग आहे, हे आपल्याला यानिमित्ताने जोखता आले.
भविष्यात ‘इस्रो’ अनेक महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमा पार पाडण्याचे नियोजन करत आहे त्यात गगनयान ही अंतराळात मानव पाठवण्यासाठी सज्ज असलेली मोहीम आहे. शिवाय सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल १’ या मोहिमेचा समावेश असेल. मंगळयान या आपल्या आधीच्या मोहिमेचा विस्तार असे प्रकल्प दृष्टीक्षेपात आहेत. तेव्हा भविष्यात ही गगनभरारी सुरूच असेल. तूर्तास ‘येणाऱ्या बातम्या चंद्रावरून आहेत’ ही बाब आपल्या वैज्ञानिक प्रगतीची साक्ष आहेत त्यात निरंतर भर पडावी ही सार्थ अपेक्षा नेहमीच असेल.