*पालकांचा संताप, टोमणे आणि बाहेच्यांची चेष्टेची नजर यामुळे तो विद्यार्थी आतून कुठेतरी खचत जातो आणि त्याची परिणीती अशा टोकाच्या प्रसंगातून समोर येते.*
गेल्या आठवड्यात राजस्थानमधील कोटा येथे नीट – जेईई ची तयारी करणाऱ्या लातूरच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. त्यानंतर गेल्या आठ महिन्यात २३ विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले. त्यानंतर समाजात या विषयाची मोठ्या प्रमाणावर साधक-बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. सध्याच्या पिढीला तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागते हे आपण पाहतच आहोत. केवळ नीट – जेईई नव्हे तर अगदी तलाठी भरती साठी सुद्धा किती मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे हे आता परीक्षांच्या निमित्ताने समोर आले.
शिक्षण सर्वदूर पोहोचले तसे प्रत्येकला त्यात आपल्या उत्कर्षाची संधी दिसू लागली आणि त्यातूनच प्रत्येक विद्यार्थी आपले भवितव्य घडवण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वत:ला जोखू पाहतो आहे. त्यानिमित्ताने शिक्षणासाठी घरापासून दूर जाणे, शिकवणी लावणे, दररोज दीर्घ काळ अभ्यास करणे, यश मिळेल अथवा नाही याची शाश्वती नसणे यासह असंख्य कारणे असतात ज्यामुळे विद्यार्थी सतत ताण सहन करत असतात. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर प्रवेश परीक्षा असो अथवा स्पर्धा परीक्षा असो त्याच्या ओझ्याखाली दबून नैराश्य आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्राण गमावले आहेत. हा आकडा देशपातळीवर मोठा आहे. जेव्हा एखादी साथ येते आणि त्यामुळे नागरिक आपले प्राण गमावतात त्यावेळी समाजात जो आक्रोश निर्माण होतो तसा आक्रोश दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या आत्म्हत्येसंदर्भात होत नाही. अर्थात याला कारण म्हणजे या आत्महत्या एकाच वेळी होत नाही आणि त्या वेगवेगळ्या परिस्थितीत होत असतात त्यामुळे त्यामागची तीव्रता एकदम लक्षात येत नाही.
विद्यार्थी म्हणजे काही यंत्र नव्हेत की ते तुम्हाला हवा तो आणि हव्या तितक्या वेळात निकाल देतील. मुळात प्रवेश परीक्षा अथवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालं म्हणजे सगळे प्रश्न संपतात असे नाही. मात्र समाज विद्यर्थ्यांसमोर असं चित्र निर्माण करतो की परीक्षा हेच अंतिम ध्येय आहे. आयुष्याचा खरा आनंद, ध्येय, जगण्याचे इतर उद्देश यांना नेहमीच दुय्यम लेखले जाते आणि त्यामुळेच ही स्पर्धा जीवघेणी ठरू लागते. विद्यार्थी जर मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल तर तो जीवनातील प्रश्न, समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो पण या मुलभूत बाबीकडे लक्ष न देता केवळ परीक्षांवर लक्ष केंद्रित झाल्याने विद्यार्थी आत्महत्यांची समस्या दिवसागणिक अधिक भीषण होत चालल्याचे बघायला मिळते.
पालकांची आपल्या पाल्याकडून अपेक्षा असणे काही गैर नाही, अगदी पालकच नव्हे तर शिक्षक आणि समाज हे देखील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा ठेवत असतात. परिणामी शैक्षणिक यश म्हणजेच काय ते यश असा विद्यार्थ्यांचा देखील समज होतो आणि मग आयुष्यातील आनंद, आंतरिक समाधान म्हणजे काय याचे आकलनच त्या विद्यार्थ्याला होत नाही. परिणामी करिअर मधील चमकदार कामगिरी एवढेच एक ध्येय समोर असल्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण होते आणि मग न संपणाऱ्या प्रश्नांची मालिका सुरु होते. उत्तम अभ्यास करून यश मिळवणे काही गैर नाही मात्र अभ्यास पेलवला नाही तर माझा जगून तरी काय उपयोग हा प्रश्न विद्यार्थ्याला का सतावतो तर त्याच्या पुढे खूप मर्यादित ध्येय असते म्हणून! जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही यशस्वी होत नसतात. यश-अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र आपल्या पाल्याला अपयश येऊच कसे शकते हा पालक विचार करत असतील तर त्यामुळे विद्यार्थ्यावर दडपण व्हायला सुरुवात होते. एकदा तुम्ही शैक्षणिक कामगिरी चमकदार केली तर सतत ती तशीच असेल ही अपेक्षा ठेवणे मुळात चुकीचे आहे. हुशार विद्यार्थ्यांना अपयश पचवणे तुलनेने अवघड जाते कारण त्यांच्याकडून जाणते अजाणतेपणी सतत यशाचीच अपेक्षा केली जाते. निश्चितपणे या विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक दिशा देणारी असते. त्यातून त्यांचे भावी जीवन आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या अधिक स्थिर आणि चांगले होऊ शकते. पण सर्व काही हे एका परीक्षेच्या दिवसावर अवलंबून आहे आणि यामुळेच आपल्या आयुष्याचा निर्णय होणार आहे असे नाही हे समजून घेतले गेले पाहिजे. यासाठी पालक आणि विद्यार्थी या दोघींचे समुपदेशन व्हायला हवे. एकंदरीत आपल्या देशातच समुपदेशनाची वानवा आहे तेव्हा याकडे निकडीने लक्ष दिले जाणे ही काळाची गरज आहे.
आज मोठ्या प्रमाणात युवा वर्ग अनेक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी झगडतो आहे. जेव्हा त्यांना यश मिळते ते मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. त्यातूनच कुठेतरी इतरांवर हे बिंबवले जाते की तत्सम परीक्षांमधील यश हीच समाजातील प्रतिष्ठेची गुरुकिल्ली आहे. लौकिक यशासाठी पालक आणि मुले यासाठी सरसावतात मात्र अपयश मिळाले तर काय याचा सुरुवातीलाच विचार होत नाही. अपयश मिळाले तर त्यातून बाहेर पडायचे कसे याविषयी देखील पालक आणि पाल्य अनभिज्ञ असतात. पालकांचा संताप, टोमणे आणि बाहेच्यांची चेष्टेची नजर यामुळे तो विद्यार्थी आतून कुठेतरी खचत जातो आणि त्याची परिणीती अशा टोकाच्या प्रसंगातून समोर येते. तेव्हा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी व्यापक स्तरावर मंथन होणे गरजेचे आहे. नाहीतर परीक्षांचा चक्रव्यूह न भेदू शकणारे अभिमन्यू आपले आयुष्य या खोट्या प्रतिष्ठेपायी पणाला लावत राहतील.