आता महिलांना राजकारणात अधिक संधी आणि त्यांचा विचार करणाऱ्या पक्षांना एक मोठी संधी मिळू शकते.
लोकसभेच्या निवडणुकांना अवघे काही महिने बाकी असतांना ४ महत्त्वाच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि उपांत्य सामना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३ राज्यात दणदणीत यश संपादन केले तर तेलंगण राज्यात राष्ट्रीय पक्ष होण्याची आकांक्षा सिद्धीस नेऊ पाहणाऱ्या प्रादेशिक पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीस पराभवाचे तोंड बघावे लागले.
या निवडणुकांचे विश्लेषण करायचे झाल्यास जिंकल्यानंतर जेत्यांच्या बलस्थानांचे कौतुक करणे आणि पराभूतांच्या वैगुण्याकडे निर्देश करणे ही एक रीत आहे. परंतु त्यापलीकडे देखील या सर्व निकालांकडे पहावे लागेल. सर्वप्रथम उत्तरेतील तीन राज्यात भारतीय जनता पक्षाने जे काही यश संपादन केले आहे त्या पार्श्वभूमीवर तिथल्या जनतेच्या मनात नक्की काय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कॉंग्रेस पक्षाने अलीकडे इतर मागासवर्गीय जातींना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी जातनिहाय जणगणनेचा मुद्दा लावून धरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला देशात फक्त चार जाती आहेत त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या होय. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उत्तराला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे. केवळ निवडणुकांपुरते न बघता जातीय मुद्दा निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसा ठरू शकत नाही ही एक आशादायी बाब म्हणता येईल. अर्थात एका विजयावरून जातीचा मुद्दा आता परिणामकारक राहिलेला नाही हा निष्कर्ष काढणे उतावीळपणाचे लक्षण ठरेल. मात्र जर सर्वसमावेशक विचार नेत्यांनी केला तर त्याला जनता स्वीकारते हे दिसून येते. म्हणजे याचा दुसरा अर्थ असा देखील होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आता असल्या मुद्द्यांना बगल देण्यात यशस्वी ठरतात. हे त्यांचे मोठे यश आहे.
या निवडणुकांमध्ये अजून एक प्रकर्षाने मुद्दा लक्षात येतो तो म्हणजे महिलांना आता गृहीत धरता येणार नाही. महिलांनी आता मतपेटीच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा भविष्यात महिलाकेंद्री योजना अधिक आल्या तर त्यात नवल वाटून घेऊ नये. महिलांचा लोकशाहीत जर सहभाग वाढतो आहे ही पण एक सकारात्मक बाब आहे. त्यामुळे आता महिलांना राजकारणात अधिक संधी आणि त्यांचा विचार करणाऱ्या पक्षांना एक मोठी संधी मिळू शकते. मध्य प्रदेशात ‘लाडली बहन’ योजनेने शिवराज सिंह चौहान यांचा रस्ता सुकर केला यातून हा संदेश स्पष्ट होतो. या राज्यात दीर्घकाळ भारतीय जनता पक्ष सत्तेत असतांना देखील त्यांना विजय मिळत असेल तर कॉंग्रेस पक्षाने केवळ चिंतन नव्हे तर कृती देखील गेली पाहिजे. जमिनीवर नक्की काय सुरु आहे याचा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारे अदमास घेता आला हे म्हणण्यास यामुळेच वाव मिळतो.
या निवडणुकांनी अजून कुठल्या बाबींवर प्रकाश टाकला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व अधिक प्रबळ झाले हे पुन्हा एकदा समोर आले. निवडणुका जिंकण्यासाठी केवळ मुद्दे गरजेचे नसतात तर योग्य आणि सक्षम नेतृत्व देखील असावे लागते. भाजप इथे सरस ठरला आहे. केवळ नरेंद्र मोदी नव्हे तर गृहमंत्री अमित शाह यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जे नेहमी या दोन नेत्यांच्या तुलनेत झाकोळले जातात यांचे हे एकत्रित यश आहे.
तेलंगण राज्याच्या निवडणुकीचा इथे वेगळा विचार करावा लागतो. दक्षिणेतील हे राज्य कॉंग्रेस पक्षाने जिंकले हे सर्व उत्तरेतील कॉंग्रेसच्या पराभवामुळे विसरता आहेत. पण त्यामुळे या विजयाचे मूल्य अजिबात कमी होत नाही. कर्नाटक पाठोपाठ तेलंगणा राज्यात कॉंग्रेस सत्तेत आला ही त्यांच्यासाठी दिलासादायक बाब आहे. अन्यथा त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा विचार करावा तर उत्तरेतील अपयश मोठे आहे तर दक्षिणेतील यश चांगले आहे. त्यांच्या कामगिरीत सातत्य नसणे ही त्यांची मोठी उणीव आहे. आता देखील ती प्रकर्षाने समोर आली. जमिनीवर सतत काम करणे त्यांना जमत नाही ही त्यांची मर्यादा त्यांच्या नेत्यांनी पक्षांतर्गत स्वीकारायला हवी. नाहीतरी कॉंग्रेस मधून बाहेर पडणारा प्रत्येक नेता तेच बोलत असतो. ‘भारत जोडो यात्रा’ त्यांच्यासाठी किती फलदायी ठरली? हे तेलंगणाच्या यशाने ठरवणार की उत्तरेतील तीन राज्यांच्या अपयशाने ठरवणार?तेव्हा गांधी घराण्याचा प्रभाव देशावर किती आहे याचे उत्तर मतदार देत असतात पण कॉंग्रेस पक्षात मात्र त्यांच्या आडनावाचा प्रभाव इतका मोठा आहे की, इतकी वाईट कामगिरी नावावर असून देखील त्यांना पर्याय शोधण्याचा कॉंग्रेसजन प्रयत्न करत नाही. भारतीय जनता पक्षाबद्दल बोलायचे झाल्यास, अद्याप देखील दक्षिणेतील राज्यात त्यांना आपले अस्तित्व सिद्ध करता आले नाही. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला याचे उत्तर शोधावे लागेल. अर्थात तेवढी चिकाटी त्यांच्यात आहे हे मात्र मान्य करावे लागेल. गेल्या वेळच्या तुलनेत सरस कामगिरी पण सत्तासोपनापासून कोसो दूर अशी त्यांची या राज्यात कामगिरी राहिली आहे.
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा हाच जनतेचा कौल असेल असे काही नाही. मागील काही वर्षात जनतेने निवडणुका कुठल्या आहे हे लक्षात घेऊन मतदान केले आहे. तेव्हा भाजप गाफील नसेल आणि कॉंग्रेस अवसान गाळणार नाही हे त्यांच्या नेतृत्वाने लक्षात घेतले असेलच. बाकी ‘इंडिया’ नावाने उभी राहिलेली विरोधकांची आघाडी आता ‘मोदीविरोध’ यापलीकडे जाऊन विचार करते का? नसेल करणार तर ते भाजपसाठी चांगलेच ठरेल. हे या निवडणुकांचे कल छातीठोकपणे सांगतात.