संपादकीय………
दि. 21.11.2022
सेक्सटॉर्शनचा विळखा
लैंगिक भावनेचा विषय असला तर तो जास्तीत जास्त खाजगीत ठेवण्याचा आपण भारतीय प्रयत्न करत असतो आणि म्हणून हाच विषय इंटरनेट वरील या नवीन हल्लेखोरांनी हाती घेतला आहे.
सेक्सटॉर्शन मुळे कुणाला तरी गंडवले गेले यांसारख्या बातम्या कधी मुख्य पानावर अथवा कुठे तरी अडगळीत आपण वाचतो. त्यापलीकडे या सेक्सटॉर्शन मुळे तरुण मुलांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या देखील आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील आपण हे सर्व ऐकतो, वाचतो आणि सोडून देतो. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आपण इंडस्ट्री ४.० मध्ये वावरतो आहोत दिवसेंदिवस तंत्रज्ञानामुळे जे काही बदल होत आहेत त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत एवढंच नव्हे तर आपण स्वतः त्या बदलांचा उपभोग घेत आहोत. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरांमुळे आपले आयुष्य अधिक सहज सोपे झाले आहे. पण, सोबतच यामुळे अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. या बदलत्या युगाचे जसे चांगले फायदे मानवजातीला मिळत आहेत तसेच वाईट परिणामांना सुद्धा सामोरे जावं लागत आहे. अनेकदा आपल्याला सायबर गुन्हेगारीसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते आणि त्याच्या नकळत आपल्याच आजुबाजूच कुणीतरी सायबर गुन्ह्यात बळी पडत असतो. यामुळे आतापर्यंत अनेकांना हजारोंचा तर काहींना लाखोंचा आर्थिक फटका या खंडणीच्या प्रकारामुळे सहन करावा लागला आहे. हॅकर्समुळे आणि कधी- कधी लोकांच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काळात अनेक जण याला बळी पडले आहेत.
असाच एक प्रकार आपल्या आजूबाजूला अनेकदा घडतो आहे तो म्हणजे “सेक्सटॉर्शन”! इंटरनेट च्या वापरामुळे आपल्या आजूबाजूला घडलेले सायबर गुन्ह्याची प्रकरणे आपण ऐकून असालच “सेक्सटॉर्शन” हा त्याचाच एक भाग असला तरी काही कारणांनी वेगळा ठरतो. सेक्स हा विषय निघाला, की आपण तोंड फिरवून घेतो. सुसंस्कृत भारतीय तर हा विषयही तोंडावाटे काढत नाहीत. यावर खुल्या चर्चा होणे तर दूरच आहे. लैंगिक भावनेचा विषय असला तर तो जास्तीत जास्त खाजगीत ठेवण्याचा आपण भारतीय प्रयत्न करत असतो आणि म्हणून हाच विषय इंटरनेट वरील या नवीन हल्लेखोरांनी हाती घेतला आहे. यामध्ये हे हल्लेखोर समाज माध्यमांवरील प्लॅटफॉर्म वरील अकाउंट्सना टार्गेट करतात, तुमच्याशी मैत्री करून तुमचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. एकदा विश्वास वाढला की, तुम्हाला व्हिडीओ कॉल्स, फोटोज आणि इतर माध्यमातून लैंगिक क्रिया करावयास भाग पाडतात आणि तुम्ही हे सर्व करत असताना त्याचे फोटोज आणि व्हिडीओज काढून तुम्हाला पैशांची वा इतर काही मागण्या करतात आपण त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण न केल्यास तुमच्या संपर्कातील इतर मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीच्या प्रतिष्ठित लोकांना ते पाठविण्याची धमकी देतात. साहजिकच लैगिक भावनेशी संबंधित विषय असल्यामुळे काही लोकं त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण करतात जी लोकं ह्या मागण्या पूर्ण करू शकत नाहीत ते भीतीपोटी आत्महत्या सारखे पाऊलं उचलतात. अश्या प्रकारणामध्ये आजपर्यंत अनेक अल्पवयीन मुलं, तरुण आणि प्रतिष्ठित व्यक्ती फसली असून काहींनी त्यांच्या तक्रारी सुद्धा दाखल केलेल्या आहेत.
आता हा एक अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी एकत्र येत सुरु केलेला गुन्हेगारी प्रकार आहे. आपल्या टोळीतील युवतीला सोशल मिडीयाच्या सहाय्याने व्हाट्स अप कॉल करायला सांगून आणि तो रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देत गंडविण्याचा फंडाही आता या टोळ्यांसाठी जुना झाला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणामधील पुरुष मग यांत तरुण आणि वृध्द दोन्ही आले या सेक्स कॉल ला सर्वाधिक बळी पडत असल्याचं पोलीस सांगतात. या खंडणी कांडात गुलुगुलू बोलणाऱ्या तरुण मुली वेश्या व्यवसाय करणाऱ्या अधिक आहेत. सायबर गुन्हेगार त्यांना हाताशी धरून टक्केवारी ठरवून हा धंदा करतात. देशभरात दररोज सहा हजार लोकांना यांत गंडा घातला जात असल्याचं पोलीस प्रशासनातील लोक सांगतात. तसेच या खंडणी चे बळी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोकं अधिक आहेत.
हा विषय तसा खूप मोठा आहे पण समस्यां समजली असेल तर आपण उपाय जाणून घेऊन प्राथमिकतेने खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सर्वात आधी तुमच्या जवळील व्यक्तीला सांगा की आपण कोणत्या अडचणीत सापडलो आहोत जेणेकरून काही निश्चित मार्ग काढता येईल. गुन्हेगाराने तुमच्याकडे केलेली मागणी लगेच पूर्ण करू नका लक्षात ठेवा तुम्ही गुन्हेगार नाही आहात, म्हणून तुमच्याकडे केलेली एक मागणी पूर्ण केल्यास ते आणखी धमकी देऊन ते तुमच्याकडे इतर मागणी करू शकतात. तसेच तुमचे मानसिक शोषण करु शकतात.या विषयाशी संबंधित काहीही डिलीट करू नका. तुमचे त्याच्यासोबत झालेले सर्व संभाषण हा एक पुरावा आहे, कुठलेही पुरावे मिटवू नका. लक्षात ठेवा जे झालं ते झालं त्याची लाज बाळगून ते विडिओ फोटो डिलीट करू नका आता तेच तुमचं साधन आहे, जे पोलिसांना त्यांच्या पर्यंत पोहचण्यास मदत करेल. आपण ही अश्या प्रकाराला बळी पडू नये म्हणून पोलिसांना याविषयी संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे.
समाज माध्यम काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे झाले आहे. अशा प्रकारांमध्ये समाजात आपली बदनामी होईल म्हणून ज्याच्याकडे खंडणी मागितली जाते तो शक्यतो तोंड उघडत नाही परिणामी तो या सेक्सटॉर्शन च्या विळख्यात अधिकच अडकत जातो. मात्र या प्रकरणांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. तेव्हा असल्या बातम्यांकडे मनोरंजन म्हणून न पाहता गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरते. वृत्तपत्राचे काम जसे कानउघडणी करणे आहे तसेच समाजाचे प्रबोधन करणे देखील आहे. तेव्हा पालकांनी देखील याविषयी अधिक सजग होऊन आपल्या पाल्यांशी संवेदनशीलतेने या विषयावर बोलणे गरजेचे आहे. कारण तरुण एकदा या विळख्यात सापडले की त्यांना नंतर येणारी निराशा आत्म्हत्येपर्यंत घेऊन जाते आणि मग उशीर झालेला असतो. तेव्हा काळाच्या हाका ओळखत या समस्येच्या विरोधात उभे राहणे आपली नैतिक जबाबदारी आहे.
[20/11, 6:20 pm] Press Pratik Kulkarni: