नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

*दर्शन पोलीस टाईम*

संपादकीय………..

दि.19.12.2022

अपघातांचे ग्रहण…. शासन स्तरावर यासाठी अधिक दबाव आणून हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागायला हवा अन्यथा अपघातांचे हे ग्रहण सुटणार नाही.

सध्या अपघातांचे प्रमाण अधिक वाढले आहे हे सांगायला कुण्या तज्ञाची आवश्यकता नाही. दररोज बातम्यांमधून अगदी दूरचित्रवाणीच्या गोंगाटात सुद्धा अपघातांच्या बातम्या लक्ष वेधता आहेत. एखादी आकडेवारी समोर मारून फेकली की ही किती भीषण समस्या आहे याविषयी कुणाचे दुमत असणार नाही. मात्र बातम्या असो वा समाज माध्यमांतून आपल्या परिचित व्यक्तीची येणारी अपघाताची माहिती त्याकडे केवळ आकडेवारीच्या नजरेतून पाहणे पुरेसे नाही. कारण यांत अनेक जन हकनाक जीव तरी गमावत आहेत अथवा जायबंदी तरी होत आहेत. आपला देश आता विकसित होण्याकडे मार्गक्रमण करतो आहे तेव्हा पायाभुत सुविधांचा विकास होणे हे ओघाने आलेच. मात्र या स्थित्यंतरादरम्यान वाहने वाढता आहेत मात्र त्या वेगाची बरोबरी करतांना आपण जीवाला जपायला हवे याची सर्व स्तरात जनजागृती होणे आवशयक झाले आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास अनेक महामार्गांच्या काही भागांचे वर्णन ‘मृत्यूचे सापळे’ असे केले जाते. त्याला कारण म्हणजे त्याच ठिकाणी सतत होणारे अपघात हे होय. शासन स्तरावर मात्र या बाबतीत अजूनही काही भरीव काम होतांना दिसत नाही. नवीन महामार्गांची बांधणी निर्दोषपणे करणे निकडीचे झाले आहे. खर तर शासनाला अशी काही सुचना करावी लागते हेच दुर्दैवी आहे. पण आतातरी केंद्र आणि राज्य शासनाने हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडवायला हवा. काही महामार्गांचे काम तर कधी संपेल हेच समजत नाही. सरकार येता आणि जातात पण महामार्ग पूर्ण झाला असं काही म्हणता येत नाही. कुणाच्या खिजगणतीत नसलेला धुळे जिल्हा याचे एक प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. हाक नाही, बोंब नाही या तत्वावर या रस्त्यांचे काम संथगतीने सुरूच आहे. याचे अजून एक उदाहरण आहे ते म्हणजे मुंबई – गोवा महामार्ग! तेव्हा महामार्गांचे काम वेळेत पूर्ण व्हायला हवे ही जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांची अपेक्षा रास्त आहे. याशिवाय रस्त्यांची दुर्दशा हा तर एक स्वतंत्र विषय झाला आहे. समाजाचा प्रत्येक घटक खराब रस्त्यांमुळे त्रस्त झाला आहे. त्यातून काही कोणाची सुटका नाही. गल्ली पासून ते महामार्ग प्रत्येक रस्त्यांवर खड्डे आहेत आणि ते चुकवत असतांना अनेक नागरिक आपला जीव गमावत आहे यांवर शासनाने आपले मौन सोडून सर्व जनतेची क्षमायाचना करायला हवी. ‘प्रगतीशील महाराष्ट्राचा’ डिंडीम पिटत असतांना आपले नागरिक केवळ निकृष्ट रस्त्यांमुळे जीव गमावतात ही वस्तुस्थिती आहे, शासन त्याकडे डोळेझाक करू शकत नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा या सुरक्षित प्रवासासाठी नेहमीच ओळखल्या गेल्या. मात्र ही ओळख आता कायम असेल याची काही शाश्वती नाही. जनतेची एस टी देखील देखभाल दुरुस्तीच्या अभावी अपघातांच्या विळख्यात सापडली आहे. कधी भीषण अपघात तर कधी चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळलेले अपघात याची गणती सरकार स्तरावर नक्कीच होत असेल. आपलं सरकार सर्वसामान्य लोकांच आहे हे सांगायला कुठलाच नेता विसरत नाही पण जेव्हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न येतात तेव्हा मात्र सरकार नेहमीच कमी पडतांना दिसते. आधी कोरोना आणि नंतर चिघळलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे सामान्य जनतेच्या प्रवासाचा आधार असलेली एस टी अजूनही समस्यांच्या गर्तेतून बाहेर येतांना दिसत नाही. पण हे होत असतांना आपण सामन्यांच्या जीवाशी खेळतो आहोत याचे भान सरकारला असू नये. अपघात हा एक भाग झाला पण दुसरीकडे नादुरुस्त बस चालवून गोरगरीब जनतेचे काय हाल होता हे शासन बघतच असेल. भर रस्त्यात बस नादुरुस्त होते तेव्हा होणारी वाहतूक कोंडी, प्रवास्यांच्या वेळेचा होणारा अपव्यय आणि त्यापायी खाजगी वाहतूकदारांकडून होणारी आर्थिक लूट हे बातम्यांत दिसत नसलं तरी प्रत्येक प्रवासी मात्र भोगतो आहे. इतक्या असुरक्षित वातावरणात अपघात न होणे हेच नवल म्हणावे लागेल. ग्रामीण भागात ही परिस्थिती दिवसेंदिवस कठीण होते आहे. खाजगी बससेवा तर आपल्याच तोऱ्यात आहे. चालत्या बसेस भर रस्त्यात पेट घेतात यांपासून अनेक तक्रारी आल्या तरी ना शासन त्यावर कठोर निर्णय घेते ना खाजगी बसमालक आपल्या कारभारात सुधारणा करत. मग दाद मागायची कुठे?
शासन लाख चुका करत असलं तरी या अपघातांच्या मालिकेतील अजून एक अंग असलेल्या सामान्यांना देखील आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे याठिकाणी नक्कीच आवश्यक आहे. बेदरकारपणे वाहने चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक लोकांनी वाहनातून प्रवास करणे, लेन कटिंग, वेगाची मर्यादा न पाळणे यांमुळे देखील अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. नाशिकला तरुणांचा झालेला अपघात हे त्याचे ताजे उदाहरण आहे. जेव्हा देशाचे भविष्य असलेले तरुणच आपल्या चुकांमुळे जीव गमावतात, त्यांचे कुटुंबीय आक्रोश करतात हे चित्र काळीज पिळवटून टाकणारे असते. या वेदना शब्दात मांडणे पुरेसे नाही तर चांगल्या कृतीतून अपघातांची ही समस्या आटोक्यात आणण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या छोट्याश्या चुकीमुळे आपण कितीजणांचे जीव धोक्यात घालतो, किती कुटुंबांना संकटात टाकतो याची जाणीव रस्त्यावर गाडी चालवतांना प्रत्येकाने ठेवायला हवी.
दिवसेंदिवस वाढत्या संख्येने होणाऱ्या अपघातांचे ग्रहण सुटणे आवश्यक आहे. माध्यमं समस्येवर वार्तांकनाच्या माध्यमातून प्रकाश टाकू शकतात पण त्याला कृतीची जोड देखील तितकीच आवश्यक आहे. तेव्हा शासन दरबारी आणि सामान्य लोकांनी देखील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अपघात कमी कसे होतील, लोकांचे जीव हकनाक जाणार नाहीत यासाठी आपल्या परीने जे काही शक्य होईल त्यासाठी पुढाकार घेणे अनिवार्य आहे. शासन स्तरावर यासाठी अधिक दबाव आणून हा ज्वलंत प्रश्न मार्गी लागायला हवा अन्यथा अपघातांचे हे ग्रहण सुटणार नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
11:52 am, December 23, 2024
25°
साफ आकाश
Wind: 5 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!