नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाईम

संपादकीय………..



दि. 05.12. 2022

*आफताबच्या निमित्ताने….*

*इंटरनेट, ‘ओटीटी’, समाज माध्यमं यांसारख्या आधुनिक बाबींवर नियमन असायला हवे पण आपण बंधन घालू शकत नाही. असे करणे परिपक्वतेचे लक्षण देखील नाही.*

दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाचे भीषण वृत्त आपण सगळ्यांनीच ऐकले, पाहिले आणि वाचले. त्यानंतर त्या हत्याकांडाची भीषणता अधिक लक्षात येऊ लागली जेव्हा श्रद्धा चा प्रियकर खुनाची कबुली देऊ लागला. त्या कबुली जबाबाचे आणि एकंदर खून प्रकरणाचे अनेक कांगोरे आहेत आणि त्याविषयी विविध स्तरातून चर्चा होत आहे, संताप व्यक्त केला जात आहे. या खून प्रकरणातून जे अनेक निष्कर्ष काढले जात आहे त्यापैकी सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ते म्हणजे तिच्या प्रियकर मारेकऱ्याने ‘डेक्स्टर’ ही ‘सीरियल किलर’ वरील मालिका पाहून गुन्हा दडविण्याची प्रेरणा घेतल्याच्या कबुलीने. आणि मग काय त्यानंतर चित्रपट- मालिकांचा त्याचबरोबर ‘ओटीटी’ फलाटांवरील वेब सिरीज चा जनमानसावर होणारा तथाकथित दुष्परिणाम यांवर तावातावाने चर्चा सुरू आहेत. चित्रपट, ‘ओटीटी’ फलाटांवरील मनोरंजन हे नव्या पिढीसाठी हानीकारक आहे, की त्यांच्या सामाजिक आकलनाच्या दृष्टीने आवश्यक आहे अशा दोन्ही बाजूने विचार करण्याची ही वेळ आहे.
चित्रपटात असणारी हिंसा, अश्लीलता, अनैतिक नातेसंबंध हे चित्रपट पाहून समाजात येते की समाजात असलेल्या या वृत्ती दिग्दर्शक टिपतो आणि चित्रपटात मांडतो हे आपण ठरवले की ही चर्चा पुढे जाऊ शकते. एका अर्थी समाजाला आरसा दाखवायचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष तऱ्हेने कला करीत असते. जर या गोष्टी समाजात नसतील तर सेन्सॉर च्या नावाखाली कात्री लावून आपण काय हाशील करणार आहोत? चित्रपट चालावा म्हणून, त्याची चर्चा व्हावी म्हणून ‘असल्या’ गोष्टी कथानकाशी संबंध नसेल तरी चित्रपटात घुसडल्या जाताता यांत शंका नाही. चित्रपट सृष्टीतील मान्यवर देखील ही बाब नाकारणार नाही पण इतका धागा पकडून आपण जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असू तर ते अधिक वेदनादायी असेल. चित्रपटांच्या परिणामांचा विचार करता समाजाने त्याविषयी अधिक उदार असणे गरजेचे आहे. त्यामुळे चित्रपटांचा दर्जा अधिक उंचावू शकतो इतकेच काय समाजाच्या मनोरंजनाची व्याप्ती देखील वाढू शकते. अन्यथा त्याच ठरलेल्या ‘फॉर्म्युला’ चित्रपटांची कमतरता कालही नव्हती आणि आजही नाही.
मुळात चित्रपटातून समाजात फॅशन, चालण्या-बोलण्याच्या ढबी यांचे अनुकरण केले जाऊ शकते. परंतु जर कुणी ‘ओटीटी’च्या मालिका पाहून समाजात ‘सीरियल किलर्स’ निपजतात असे म्हणत असेल तर ती अतिशयोक्ती आहे असेच म्हणावे लागेल. सर्वसामान्य लोक जो काही वागतो ते ‘समाजाला काय मान्य आहे?’, ‘काय चालू शकेल?’ चा विचार करूनच करण्याची शक्यता अधिक आहे. कलेतून तितकेच अशा गोष्टींचे नक्कीच अनुकरण करू इच्छितो. त्याचा आवडता कलाकार सिनेमात अमुक स्टाइलने सिगारेट पितो म्हणून तशी सिगारेट पिणारे लोक आहेतच; किंवा जगभरच्या सिनेमात दिसणारे, विदेशी सिरीजमध्ये दिसणारे ‘सोशल ड्रिंकिंग’ थोडक्यात दारू पिणे आता आपल्याकडेही सामान्य झालेले आपण पाहत आहोत. आणि हे असे बदल टाळता येण्याजोगे नाहीत. काळानुरूप ते होतच असतात. चांगल्या-वाईट संस्कृती/ चाली-रितींचे आदानप्रदान ओटीटी, सोशल मीडिया यामुळे होणे हे कुणाला आवडो न आवडो, पण अनिवार्य आहे. पण याची व्याप्ती ही किती तर असल्या लोकव्यवहारात असणाऱ्या गोष्टी पुरता मर्यादित असते. कुठलीही वेब सीरिज, चित्रपट किंवा कला ही आपल्या सवयींवर प्रभाव पाडू शकते पण खून करणे, अत्याचार करणे यासाठी आपला मूळ स्वभाव अधिक कारणीभूत असतो हे मान्य करायला हवे जरी ते आपल्या मनाच्या विरुध्द असले तरी.
समाजविघातक काय आहे? पडद्यावर कशा प्रकारचा आशय असायला हवा? हे कुणीतरी सांगणे हेच मुळात धोकेदायक आहे. जर आपल्याला काय चांगलं आणि काय वाईट हे समजून घेण्याची कुवत असेल आणि त्याचबरोबर अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आपल्याला कदर असेल, चित्रपटाची कथा नक्की काय सांगू इच्छिते, दिग्दर्शक त्याची मांडणी कशा प्रकारे करू शकतो हे समजावून घेणे नक्कीच मनोरंजनाच्या पलीकडे आहे. हे समजावून घेणे म्हणजे आपल्या दृष्टीची कवाडे विस्तारीत करणे होय. कलावंतावर अधिकाधिक कडक नियम लादण्यापेक्षा तो कलावंत काय सांगतोय याचा विचार आपल्याला करता यायला हवा.
काय योग्य आणि काय वाईट याबद्दलचे संस्कार आपल्यावर केवळ चित्रपट करत नाही. आपले पर्यावरण, शिक्षण, घरातील वातावरण यांसारख्या अनेक बाबी त्यासाठी कारणीभूत असतात. मग काही वाईट घडलं की केवळ चित्रपट त्यासाठी कारणीभूत आहे हे समजणे बालिशपणाचे लक्षण आहे.
आज वाढलेले समाज माध्यमांचे प्रस्थ असेल, इंटरनेट चा मुक्त संचार यांवर साधक बाधक चर्चा व्हायला हवी पण त्यापासून आपली मुक्तता नाही, काळाची उलटी पावले आपण चालू शकत नाही हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. या आधुनिक बाबींवर नियमन असायला हवे पण आपण बंधन घालू शकत नाही. असे करणे परिपक्वतेचे लक्षण देखील नाही.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
11:51 am, December 23, 2024
25°
साफ आकाश
Wind: 5 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!