नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाईम.
संपादकीय……………..
दि. 12/06/2023.
मराठी चित्रपटांची रडकथा

*कलेची अधिक व्यवसायाची जाण असलेला मराठी चित्रपट निर्माता दुर्मिळ होत चालला आहे हा या चर्चेचा परिपाक म्हणायला हवा.*
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि देशभर अनेक चर्चांना उधाण आले. महाराष्ट्रात देखील एक वाद निर्माण झाला आणि तो या सर्वांपेक्षा वेगळा होता. हिंदी चित्रपटांच्या कथित आक्रमणामुळे महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही. हा आक्षेप! कुणी जाणता म्हणेल यात नवीन काय? कुणी थिएटर देता का थिएटर? हा प्रसंग मराठी जनांना नवीन नाही. मात्र या जुन्या दुखण्याला अनेकदा उमाळा येतो. आता ‘द केरल स्टोरी’ प्रदर्शित होऊन आठवडे उलटले. गल्ल्यावर या चित्रपटाने ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ घेतली आणि इकडे मराठी चित्रपटांची रडकथा अद्याप तरी थांबलेली नाही. याचा अर्थ काही मराठी चित्रपटाला कमी लेखणे होत नाही तर मराठी चित्रपटांची एकंदरीत होत चाललेली पिछेहाट तसेच मराठी चित्रपटांच्या संदर्भात नव्हे मराठी चित्रपट व्यवसायाच्या संदर्भात चर्चा करणे हा आहे.
मराठी चित्रपटांना चित्रपटगृह न मिळणे हे दुखणं किती जुनं आहे त्यासाठी अभ्यासक वाद घालू शकतात. पण अलीकडे जरी म्हणायचं झालं तर मराठी चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे दादा कोंडके यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळावे म्हणून दाद मागितली होती. मग त्यांनी देखील आपल्या कार्यशैलीने तो प्रश्न तडीस लावला वगैरे. यांत खटकणारी गोष्ट ही की आज देखील आताच्या मराठी हृदयसम्राटांना अशीच काही साद घातली जाते आणि मग बळेच काही हालचाल होते. म्हणजे राजकारण्यांच अपयश म्हणायचं झालं तर इतक्या वर्षात काही स्थायी उपाय यांना सापडला नाही आणि चित्रपट क्षेत्रातील धुरीणांना देखील ‘आपले तारणहार आणि त्यांचा दरबार’ यापलीकडे फार प्रयत्न करावेसे वाटले नाही. इथेच खरी मेख आहे. जेव्हा मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळणे अशक्य होते ही बाब खरी असेल तर आजवर व्यवसाय म्हणून याकडे तमाम जाणत्या नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे म्हणावे लागेल. आपली काही मागणी असेल तर ती एखाद्या नेत्याकडे घेऊन जाणे यांत काही कमीपणा नाही मात्र दरवेळेस कुठल्या तरी नवीन नेत्याला जुनीच साद घालायची असेल तर आपली मागणी रास्त असली तरी पाठपुरावा चुकीच्या पद्धतीने होतो आहे हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. थोडक्यात यांवर काही शाश्वत उपाय असावा इतकी मोठी झेप घेण्यात आपण मराठी जन कमी पडलो हे जाणलेले बरे!
मराठी चित्रपटांना खरंच चित्रपटगृह मिळत नाही की मराठी चित्रपट कमी पडतो आहे याची परखड चर्चा होणे गरजेचे आहे. कारण हिंदी चे अतिक्रमण आणि त्यांची मानसिकता याविषयी आक्षेप घेण्यासारखे बरेच काही आहे मात्र त्यापलीकडे आपल्या बेफिकरीचे चिंतन होणे देखील अगत्याचे ठरते. नसता भावनिक आवेग दाखवून आपण आजवर काही भरीव साध्य करू शकलो नाही यातंच सर्व काही आले. जेव्हा एखादी कलाकृती लोकांसमोर घेऊन जायची असते तेव्हा आशय आणि आशयाचे वितरण या दोन्ही बाबींचा सारासार विचार करणे ही मुलभूत गरज झाली. आज मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही त्याला कुणी ते परप्रांतीय कारणीभूत आणि जेव्हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो तेव्हा रिकाम्या खुर्च्या म्हणजे प्रेक्षकांची अनास्था हा जो समज निर्माण झाला अथवा केला गेला आहे तो आता खोडला जायला हवा. निर्माता म्हणून आपली जबाबदारी आता मराठी निर्मात्यांनी ओळखलेली बरी अन्यथा आधीच उशीर झाला आहे. तुमच्या कलाकृतीचा आशय सकस आहे का आणि असला तरी तो इतर भाषिक चित्रपटांपेक्षा वेगळा आणि अद्वितीय कसा आहे याविषयी मराठी निर्माते दिग्दर्शक किती विचार करतात? त्याचबरोबर त्याचे वितरण प्रेक्षकापर्यंत योग्य रीतीने व्हावे याची व्यावसायिक जाण किती निर्मात्यांना आहे? अगदी सर्व निर्मात्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची गरज नाही परंतु कलेची अधिक व्यवसायाची जाण असलेला मराठी चित्रपट निर्माता दुर्मिळ होत चालला आहे हा या चर्चेचा परिपाक म्हणायला हवा.
बर! एकवेळ असं म्हणू की चित्रपटगृह नाही म्हणून मराठी चित्रपट मागे पडला तर मग दूरचित्रवाणी आणि अगदी आबालवृद्ध ज्याला आता चांगलेच सरावले आहेत त्या ओटीटी वर मराठी चित्रपटांची स्थिती काय आहे? तिथे आपली घोडदौड सुरु आहे असे कोण म्हणेल? दाक्षिणात्य चित्रपटांनी भाषेचा अडथळा पार पाडत सर्वत्र आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला. मग त्यांना मसाला वगैरे विशेषण लावले की नाक मुरडायला आपण मोकळे असतो. परंतु केवळ चित्रपटाचा आशय काय आहे एवढाच विचार न करता आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावत त्यांनी जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा नव्हे की त्याचं काय ते चांगलं आणि आपलं सर्व काही वाईट! मात्र आपण आपले न्यून जाणले नाही, मान्य केले नाही तर लयाला चाललेला मराठी चित्रपट कसा तरेल हा विचार व्हावा. मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत म्हणा किंवा संकल्पनेच्या बाबतीत निश्चित उजवा दिसतो परंतु ती गोष्ट जेव्हा पडद्यावर चितारायची वेळ येते तेव्हा आपण काहीसे मागे पडतो आणि व्यवसायाची वेळ आली की गुडघे टेकतो असे मराठी चित्रपटसृष्टीचे व्यापक चित्र आहे. अपवाद आहे पण त्यांच्या जीवावर हा खेळ किती लांबवणार हा प्रश्न आहे.
केवळ मराठी चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकंच चुकतात बाकी सर्व आलबेल आहे असे मुळीच नाही. सरकार म्हणून जी काही व्यवस्था आहे त्यांच्यावर टीका करणं म्हणजे निव्वळ औपचारिकता पूर्ण करण्यासारखे आहे. राजकारण्यांना कशी दूरदृष्टी नाही हे तर याआधी आलंच आहे. प्रेक्षक देखील पायरसीची वाट सोडत नाही हा पण एक भाग आहेच. सध्याच्या काळात ‘दर्जा’ या शब्दाला काही किंमत राहिलेली नाही. ‘फुकट ते पौष्टिक’ हे जणू गर्दीचे तत्वज्ञान झाले आहे. परंतु त्याची किंमत आपण या ना त्या प्रकारे फेडू हा विवेक गर्दीत दिसत नाही. तेव्हा एकांडे शिलेदार काही तरी करता आहेत त्यात काय ते समाधान मानावे. मराठी चित्रपट म्हणजे केवळ मराठी भाषा नाही तर आपली माती, रंग-रूप, चालीरीती, आपले संस्कार, आपली संस्कृती यांचे दृक-श्राव्य रूप आहे. तेव्हा मराठी चित्रपट मागे पडतो म्हणजे मराठी म्हणून आपले जे अस्तित्व आहे ते कुठेतरी आकुंचन पावते आहे याची जाणीव प्रत्येक मराठीप्रेमी मनास टोचणी लावते. मात्र सध्या तरी ही रडकथा पडद्यावरून सरत नाही. भविष्यात या भिंती तोडून नवं काही उमलेल याची आशा कुठला मराठीजन सोडणार नाही हे मात्र शतशः मान्य!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
7:49 am, December 23, 2024
19°
साफ आकाश
Wind: 6 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!