DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: पांडुरंग माने
धाराशिव : : धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवत विनोद चव्हाण यांना ही शिक्षा सुनावली आहे. 25 जानेवारी 2018 रोजी सकाळी येरमाळा पोलिस ठाण्यातील तत्कालीन सपोनि विनोद चव्हाण यांनी पत्नी मोनाली यांच्या छातीत गोळी घालून हत्या केल्याचं त्यांच्यावर आरोप होता. न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांना धाराशिव येथील जिल्हा व प्रमुख सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पत्नीच्या खुनात दोषी ठरवले आहे. यावेळी न्यायालयाने जन्मठेपे व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे चव्हाण हे अटक झाल्यापासून कारागृहात होते. तर हे प्रकरण आरोपी न्यायालयीन कोठडीत (अंडर ट्रायल) ठेवून चालविले गेले होते. या हत्याकांडाची राज्यभरात चर्चा झाली होती.
सविस्तर प्रकरण :- मोनाली व विनोद चव्हाण यांचा 2014 साली विवाह झाला होता. लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूल होत नव्हते. त्यामुळे नैराश्येतून मोनाली यांनी पती विनोद चव्हाण यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे सांगितले गेले. मात्र अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोनाली यांचे वडील शेषांक जालिंदर पवार यांनी आपल्या मुलीची हत्या झाली असल्याचं आरोप केला. तर चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेली पाच लाख रुपयांची रक्कम आण म्हणून पती विनोद चव्हाण यांनीच खून केल्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली होती.
सासू-सासऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
चव्हाण यांचे सासरे शशांक पवार यांच्या तक्रारीवरून विनोद चव्हाणसह सासू विमल चव्हाण, सासरा बापू चव्हाण यांच्याविरोधात भादंवि कलम 302, 498 अ व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे देण्यात आला होता. दरम्यान न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. यावर झालेल्या संपूर्ण सुनावणीनंतर यातील विमल चव्हाण व बापूराव चव्हाण यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर विनोद चव्हाण यांना जन्मठेपाची शिक्षा सुनावली गेली आहे.