भोकरदन तालुक्यात अवैध धंद्याचा होतोय गाजा – वाजा
प्रतिनिधी: रामेश्वर शेळके
जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात ठाणेदाराच्या मूकसंमतीने अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. राजरोसपणे अवैध दारू विक्री , जुगार अड्ड्याचे व्यवसाय सुरू आहेत. हे सर्व प्रकार माहीत असूनही पोलिस प्रशासनाकडून निव्वळ बघ्यांची भूमिका घेतली जात आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी दौरा व पथक येण्याची माहिती काही खबर्याकडून तत्काळ दिली जात असल्याची चर्चा आहे.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील विविध गावांत अवैध देशी दारू सह सट्टा मोठ्या प्रमाणात चालत आहे. सहजरीत्या खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही भोकरदन शहरात गल्ली बोळात अवैध सट्टा चालु असताना पोलिस प्रशासन फक्त बघ्याची भुमिका घेत आहे . अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला आहे. राज्यात गुटखा बंदी असताना या तालुक्यातील किराणा दुकानावर गुटख्याची तंबाखु बिडीची खुलेआम विक्री होत आहे.
त्यामुळे राज्यात गुटखा बंदी असली तरी तालुक्यात मात्र कागदोपत्री गुटखा बंदी असल्याचे चित्र आहे. या अवैध प्रकारावर अंकुश बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे. पोलिसांनी गुटखा पकडला तर पुढील कार्यवाही अन्न व भेसळ विभागाकडून केली जाते. त्यामुळे हा विषय आमच्या अखत्यारित नसल्याचे पोलिसांकडून बोलल्या जाते. सबंधित विभागाला या गैरप्रकाराची तिळमात्र चिंता होत नाही.
शहरात वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारू, जुगार अड्डा, व्यवसाय थाटण्यात आला आहे. येथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. खुलेआम चालणार्या अवैध व्यवसायाला ठाणेदाराची मूकसंमती असल्यामुळेच ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारी दौरा व पथक येण्याची तत्काळ खबर पोलिसांकडून अवैध व्यावसायिकाला देऊन सर्तक केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, यामुळे अवैध व्यवसाय एक प्रकारे सुरक्षित चालतो. स्थानिक पोलिस प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून अवैध व्यवसायाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्षाची भूमिका घेतली जाते. याचा अर्थ काय हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.