DPT News Network मध्य प्रदेश : आधीच पश्चिम बंगालमधील शिक्षण विभागातील घोटाळा आणि अर्पिता मुखर्जी ही देशभर गाजत असतानाच आता मध्य प्रदेशातही एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात बराच काळा पैसा सापडला आहे. एवढी संपत्ती पाहून तपासासाठी आलेले अधिकारीही चक्रावले. या लिपिकाच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 85 लाख रुपये रोख सापडले आहेत. त्याच्या भोपाळ येथील घरी ही छापेमारी करण्यात आली आहे. या हिरो केसवानीने 4000 रुपये प्रति महिना पगारावर नोकरी सुरू केली होती आणि सध्या त्याचा पगार 50,000 रुपये प्रति महिना आहे. मात्र अचानक धाडीत एवढा पैसा सापडल्याने खळबळ माजली आहे.
*धाड पडल्यावर फिनाईल पिला*
एवढी मोठी रक्कम ब्रीफकेसमध्ये ठेवण्यात आली होती. ईओडब्ल्यू विभागाचे पथक बैरागढ येथील हिरो केसवानी यांच्या मिनी मार्केटमध्ये कारवाईसाठी पोहोचले असता त्याने तब्येत खालावली असल्याचा बाहणाही केला. त्याने फिनाईल प्यायल्याच्याही चर्चा रंगल्या. त्यानंतर त्याला तातडीने हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे चौकशी होऊ शकली नाही. मात्र केसवानीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ईओडब्ल्यूच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली असून आणखी काही नवे ट्विट या प्रकरणात येण्याची शक्यता आहे.
*बऱ्याच दिवसांपासून याच्याविरोधात तक्रारी*
ईओडब्ल्यूकडे लिपिक हिरो केसवानी याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. यानंतर ईओडब्ल्यूच्या पथकाने पहाटे बैरागढ येथे राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या लिपिकाच्या घरावर छापा टाकला. मात्र या छाप्यानंतर सर्वचजण आवाक राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या शिक्षण विभागात एक मोठा घोटाळा समोर आला आहे. त्यातही कोट्यवधी रुपये सापडले. या प्रकरणात अर्पिता मुखर्जी आणि पार्थ चॅटर्जी हे सध्या कोठडीत आहेत. त्यांच्याकडेही पैशांचा मोठा ढिगच सापडला आहे. या घटनेने पुन्हा पश्चिम बंगालच्या घटनेची अनेकांना आठवण करून दिलीय.