बामखेडा महाविद्यालयात म.गांधी, शास्त्री जयंतीदिनी व्याख्यान
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- रविंद्र गवळे
नंदुरबार – अवयवदाना अभावी दरवर्षी पाच लाख लोक मरण पावतात. आपण रक्तदान आणि नेत्रादाना पर्यंतचा टप्पा गाठला असून, आता युवकांनी अवयवदानाचे महत्व समजून घेतले पाहिजे. तुमच्या अवयवदानातून किमान आठ लोकांचे प्राण वाचू शकतात. म्हणून मरावे परंतू अवयव रुपी उरावे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते विष्णू जोंधळे यांनी बामखेडा (ता.शहादा) येथे महात्मा गांधी जयंतीदिनी आयोजित व्याख्यान प्रसंगी केले.
ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालय, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने महाविद्यालयाचा सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्त अवयवदान महादान या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन खान्देशातील प्रसिद्ध सुत्रसंचालक विष्णु जोंधळे हे होते. प्राचार्य एच. एम. पाटील, प्रा. डॉ. वाय. सी. गावित, प्रा. डॉ.बी.डी. वाघ, प्रा. अनिल गोसावी उपस्थित होते. यावेळी बोलताना जोंधळे यांनी गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या समर्पणाचे मोल सांगत जे दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात तेच पूजनीय आणि स्मरणीय होतात असे मत मांडले. बहुमोल असे शरीर व त्यातील लिव्हर, किडनी, डोळे, त्वचा, हृदय आदि अवयव मरणोपरांत दान देता येतात. यात लिव्हर व त्वचा हे मात्र जिवंतपणी देखील दान करता येतात असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. प्राचार्य एच.एम.पाटील यांनी अध्यक्षीय मनोगतात वैयक्तिक अहंकाराचा त्याग करणे हे देखील समाजासाठी मोठे दान आहे. ज्यातुन भांडणे, क्लेश व गून्ह्यांची संख्या कमी होईल असे सांगितले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना माय भारत वही व पेनचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.वाय.सी.गावित तर आभार प्रा.अनिल गोसावी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उध्दव चौधरी, ईश्वर निकुंभे यांनी सहकार्य केले.