DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
मुंबई : बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह राज्यातील 30 वरिष्ठ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून त्यासंबंधीचा शासकीय आदेश मंगळवारी रात्री जारी करण्यात आला आहे. यातील अनेक अधिकार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
या आदेशानुसार मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची बदली झाली असून ते आता राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक असतील. तसेच बृहन्मुंबई सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील.
मिलिंद भारंंबे नवी मुंबईचे आयुक्त
विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची बदली नवी मुंबईचे पोलीस आयुक्तपदी झाली आहे. वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांची पदोन्नती झाली असून त्यांच्याकडे अपर पोलीस महासंचालक, सुरक्षा महामंडळ हे पद सोपवण्यात आले आहे. विनय कुमार चौबे हे आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त असतील. अमिताभ गुप्ता हे कायदा आणि सुव्यवस्था अपर पोलीस महासंचालक असणार आहेत.
आरती सिंह यांची बदली
अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांची सशस्त्र पोलिसमध्ये अपर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीनचंद्र रेड्डी अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त असतील. अमरावतीत डॉ. आरती सिंह यांची कारकीर्द गाजली. आरती सिंह यांची बदली करण्यात यावी यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत तक्रारही केली होती.
गुप्ता यांच्या जागी रितेश कुमार
अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या आयुक्तपदावरून बदली झाली असून त्यांना कायदा व सुव्यवस्था, अपर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या ठिकाणी रितेश कुमार पुण्याचे नवे आयुक्त असतील.