मिरची पावडरची लाखो रूपयांची विक्री
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी १७ ते २६ फेब्रुवारीपर्यंत नागपूर येथील रेशिमबाग ग्राऊंडवर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागपूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
प्रदर्शनात प्रसिद्ध भिवापुरच्या मिरचीला मोठी पसंती मिळाली आहे. तालुक्यातील नंदिता महिला मिरची उत्पादक गट व अस्तित्व महिला बचत गटाने या दहा दिवसीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनात भिवापुरच्या मिरचीचे पावडर व वाळलेल्या लाल मिरचीची तीन लाख सत्तावन हजार रूपयांची विक्रमी विक्री केलेली आहे. सोबतच मुंबई व नागपूरातील मनीषनगर, शुक्रवारी, रेशिमबाग येथून त्यांना सातशे किलोग्रम मिरची पावडरचीसुद्धा आर्डर मिळाली असल्याचे व पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याचे बचत गटाच्या गीता भोयर आणि हर्षा वासनिक यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे संकल्पनेतून भिवापुर तालुक्यात उमेदच्या महिला मिरची उत्पादक गटाच्या माध्यमातून आत्मा-कृषि विभागाच्या सहकार्याने भिवापुरी मिरची संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत आहे. लोप पावत चाललेली भिवापुरी मिरची ग्राहकांना भविष्यात अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठीचे यातून नियमित प्रयत्न सुरु आहेत. याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, आत्मा- कृषि विभाग प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, गट विकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.