Dpt news network. प्रतिनिधी – सुनील कांबळे
मुंबई: मुंबईच्या दादर पश्चिमेत छबीलदास सभागृहामध्ये आज पहाटेच्या पाच सुमारास एलपीजी सिलेंडर ब्लास्ट होऊन आग लागल्याची धक्कादायक घटना आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाणे हद्दीतील छबिलास इंग्लिश मीडियम हायस्कूल, दादर पश्चिम या शाळेच्या टेरेसवर मंगळवारी एलपीजी गॅसचा स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना समोर आली.
या आगीमध्ये छबिलास शाळेच्या कॅन्टीन मध्ये झोपलेले केटरिंगचे काम करणारे कामगार 1) भरत माधव सिंग जारंग, वय 25 वर्ष, हा जखमी झाला असून 2) जावेद अली मोहम्मद सज्जाद अली, 38 वर्ष, याच्या डोक्याला मार लागला आहे. दोघांनाही उपचारासाठी सायन रुग्णालय येथे नेण्यात आले. पोलीस स्टाफसह फायर ब्रिगेडच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे.
या आगीमध्ये (Fire) टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडलेले आहेत, त्यामुळे शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचे नुकसान झालेले आहे. शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले असून प्राथमिक तपासात ही आग एलपीजी गॅसचा स्फोट झाल्यामुळे लागली असा अंदाज वर्तवला जात आहे. एकापेक्षा जास्त सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याने संपूर्णपणे मजला उध्वस्त झाला आहे, दुसऱ्या मजल्याचा स्लॅब देखील खाली पडला आहे.
या ब्लास्टमुळे समोरील घरांमध्ये देखील काचेचे तुकडे उडाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन अर्धा तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र हा सिलेंडर ब्लास्ट कशामुळे झाला याचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी करत आहेत.