Dpt news network मुंबई: फेसबुकच्या माध्यमातून सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या बोरिवलीतील २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. फेसबुकवर महिलेच्या नावानं फेसबुक अकाऊंट उघडून हा तरुण अनेकांशी रोमँटिक संवाद साधायचा. त्यानंतर त्याच संवादाचे स्क्रीनशॉट काढून समोरील व्यक्तींना ब्लॅकमेल करायचा, त्यांच्याकडून पैसे उकळायचा. याबद्दल तक्रार मिळाल्यानंतर कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २९ वर्षांच्या तरुणाला बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ५२ वर्षीय व्यक्तीनं तक्रार नोंदवली होती. मे महिन्यात या व्यक्तीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. प्रोफाईल फोटो त्याच व्यक्तीच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेचा होता. त्यामुळे तक्रारदारानं रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर पुढच्या काही दिवसांत दोघांमध्ये फेसबुकवरून संवाद सुरू झाला. तक्रारदाराला रोमँटिक मेसेज येऊ लागले. थोड्याच वेळात अश्लील आणि पॉर्न कंटेटही येऊ लागला. तक्रारदार फेसबुकवर महिला समजून ज्या व्यक्तीशी बोलत होता, ती महिला नव्हती, तर त्याच्याच इमारतीत राहत असलेला २९ वर्षांचा तरुण होता.
पीडित व्यक्तीशी काही दिवस चॅट केल्यानंतर आरोपीनं संवादाचे स्क्रीनशॉट घेतले आणि ब्लॅकमेलिंग सुरू केलं. पैसे दे, अन्यथा स्क्रीनशॉट इमारतीमधील सदस्यांना पाठवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी पीडित पुरुषाला मिळाली. धमकी मिळताच पीडित घाबरला. त्यानं आरोपीला १० हजार रुपये दिले. मात्र आरोपीकडून होत असलेली मागणी वाढतच गेली. आरोपीनं अशाच प्रकारे इमारतीमधील आणखी १० ते १५ जणांना ब्लॅकमेल केलं.
आरोपी तरुणानं ज्या महिलेच्या नावानं बोगस फेसबुक अकाऊंट सुरू केलं, त्या महिलेला याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढल्यावर सोसायटीमधील काहींनी महिलेच्या कानावर हा विषय घातला. महिलेचा फोटो, तिची माहिती यांचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट होताच महिला आणि तक्रारदारानं ३० जुलैला तक्रार नोंदवली, असं झोन १२चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांनी सांगितलं.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. आरोपी तक्रारदाराला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. तक्रारदारानं पैसे देण्याची तयारी दाखवली. इमारतीमध्ये उभ्या असलेल्या एका कारच्या चाकाजवळ पैसे ठेव, असं आरोपीनं तक्रारदाराला सांगितलं. त्यानंतर तक्रारदारानं एक लिफाफा कारच्या चाकाजवळ ठेवला. तो घेण्यासाठी आरोपी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.