DPT NEWS NETWORK 🗞️✍️
ठाणे : राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची ठाणे पोलीस आयुक्त पदावर गृह विभाग आदेश जारी करत नियुक्ती केली. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त पदावर काम केले असून तेव्हा त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता.
ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. जयजीत सिंह हे गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही तसेच त्यांची पोलीस महासंचालकपदी बढती झाल्यानंतरही त्यांना ठाणे पोलीस आयुक्तपदी कायम ठेवण्यात आले होते. अखेर गृह विभागाने त्यांची बदली केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यामुळे रिक्त झालेल्या ठाणे पोलीस आयुक्त पदावर राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंबरे हे १९९४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आणि सह पोलीस आयुक्त पदावर काम केले आहे. मितभाषी आणि स्पष्टवक्ता अशी त्यांची ओळख आहे.
ठाण्यात सह पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी शहराच्या वाहतूक नियोजनात टापटीपपणा यावा यासाठी त्यांनी पावले उचलली होती. घरात एकटेच वास्तव्य करणाऱ्या ज्येष्ठांवरील अत्याचार आणि लुटीच्या उद्देशातून त्यांची होणारी हत्या अशा स्वरूपाचे गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली होती. केवळ हेल्पलाइन सुरू करण्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने ज्येष्ठांसाठी ‘कर्तव्य’ हा उपक्रम हाती घेतला होता. घोडबंदर येथील कासारवडवली भागात एका तरुणाने ११ जणांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.