आय. जी. भुजबळ यांच्या पथकाने एकाच रात्री पकडले 17 ट्रक
भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात केली कारवाई
महसूल आणी पोलीस विभागाची लक्तरे वेशिवर
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️. प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भंडारा :- पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने गत 10 डिसेंबरच्या रात्री वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करीत 17 ट्रक ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण 170 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने वाळू तस्करी विरुद्ध एवढी मोठी कारवाई करण्याची ही पहिलीच घटना आहे. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने पोलीस, महसूल आणी परिवहन विभागाची लक्तरे वेशिवर टांगली जाऊन या तीनही विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करी किती मोठ्या प्रमाणात फोफावली आहे त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, वडसा, भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, पवनी तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चोरीची वाळू नागपूर, वर्धा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात नेली जात आहे. विना रॉयल्टी ओव्हरलोड वाळू भरलेले ट्रक वेगवेगळ्या रस्त्यांवरून सुसाट धावतात. हा सर्व प्रकार उघडपणे सुरु आहे. मात्र ” एन्ट्री ” च्या ओझ्याखाली दबलेले पोलीस, महसूल व परिवहन विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतांना दिसतात.
मध्यंतरी नागपूर जिल्हाचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भिसी आणी भिवापूर मार्गे होतं असलेल्या वाळू तस्करीवर विशेष लक्ष दिल्याने वाळूची चोरटी वाहतूक मंदावली होती. मात्र आरमोरी तालुक्यातील वैरागड व वडसा तालुक्यातील कोंडला येथील वाळू घाट सुरु झाले व वाळू तस्करीने पुन्हा एकदा उचल घेतली. वाळू भरलेले ट्रक टिप्पर रात्रीच्या अंधारात पुन्हा एकदा सुसाट धावू लागले आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. विविध घाटांमधून वाळूचा उपसा करुन ती रामटेक, मौदा, देवालापार मार्गे नागपूर व अन्य ठिकाणी वाहून नेली जात आहे.
एकीकडे चोरीची वाळू भरलेली वाहने महामार्गांवर सुसाट धावत आहेत तर दुसरीकडे एन्ट्री च्या रूपात मिळणारा मलिदा गोळा करण्यात अधिकारी वर्ग व्यस्त आहे. यातून दररोज शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. मात्र त्याचे कुणालाही सोयर सुतक नाही. विशेषतः महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी वाळू तस्करी हे वरकमाईचे एक चांगले माध्यम बनले आहे.
—> आय. जी. भुजबळ ॲक्शन मोड वर
गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणी नागपूर जिल्ह्यात सुरु असलेली वाळू तस्करी पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ यांच्या निदर्शनास आली व त्यांनी कारवाईचा बडगा उगारला. चार वेगवेगळी पथके तयार केली. या पथकाने भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात कारवाई करीत एकाच रात्री 17 वाळूचे ट्रक पकडून एक कोटी पेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने हडकंप माजला असून वाळू तस्करांसोबतच ‘एन्ट्री’ ला चटावलेल्या अधिकाऱ्यांचे धाबे दनाणले आहेत.
—–> जिल्हाधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
वाळूचा बेकायदेशीर उपसा व वाहतुक यांवर प्रतिबंध लावण्याची जबाबदारी मुख्यत्वे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यामधील घाटांमधून बेकायदेशीररित्या वाळूचा प्रचंड प्रमाणात उपसा करुन तो ट्रक टिप्पर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी वाहून नेला जातो. हा सर्व प्रकार बिनबोभाट पणे सुरु असतांना तो थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून फारसे प्रयत्न होतांना दिसत नाही. उलट महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच वाळू तस्करी फोफावल्याचे जनमानसात बोलले जात आहे.