अहमदाबाद: भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मालिकेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 6 फेब्रुवारीपासून दोन्ही संघातील वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेतील दुसरा सामना 9 फेब्रुवारी तर तिसरा आणि अखेरचा वनडे सामना 11 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने (GCA) एका ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, ‘आम्ही वेस्ट इंडीज विरुद्धची वनडे मालिका घेण्यासाठी सज्ज आहोत. या मालिकेसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वेस्ट इंडीज विरुद्धचा पहिला सामना भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. भारतीय संघ वनडेतील 1000 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बोर्डाने आणखी एक ट्विट केले आहे.
यात त्यांनी संपूर्ण मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार असल्याचा उल्लेख केला आहे. वनडेनंतर दोन्ही संघ तीन सामन्यांच्या मालिकेसाठी टी-20 मालिकेसाठी कोलकाताला रवाना होती. टी-20 मालिकेसाठी कोलकाता सरकारने 75 टक्के मर्यादित प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यातून रोहित शर्मा पुन्हा कमबॅक करणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता. या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी सामन्यातून दमदार सुरुवात केली. पण त्यानंतर उर्वरित दोन कसोटी सामने गमावल्यानं त्यांना कसोटी मालिका गमवावी लागली. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे रोहित शर्माच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तीन सामन्याच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघाला व्हाईट वॉश केलं होते. त्यानंतर भारतीय संघाची घरच्या मैदानात ही पहिली मालिका असेल.