व्यक्ती स्वभावातील दोष : अती तेथे माती
” कोणत्याही गोष्टीचा अतिरेक
पतनाला कारणीभूत ठरतो
मग पद,पैसा, प्रतिष्ठा जीवनातील
सर्व समाधान संपवतात ”
ज्याप्रमाणे निसर्गात ऋतूनुसार बदल होत जातात. अगदी त्याचप्रमाणे मानवाचा वयानुसार त्यांच्या स्वभावात बदल होताना दिसून येतात. लहानपणापासून ते वयस्कर होईपर्यंत मानवातील स्वभाव परिवर्तनाची प्रक्रिया नैसर्गिक अंगातून चालू असते. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी जसे काही चांगले गुण असतात अगदी तसेच काही दोषही असतात. अशा व्यक्तीस्वभावाचे दर्शन ज्यात कोणतेही काम करण्यासाठी अत्यंत टोकाचे प्रयत्न केल्यास स्वतःच्या जीवनाचा अंत होऊ शकतो. याचे मार्मिक आणि अर्थपूर्ण वर्णन कलाकाराने आपल्या चित्रकृतीतून केलेले आहे.
ज्याप्रमाणे व्यक्तीला स्वतःआतील चांगल्या गुणांची माहिती असणे गरजेचे असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला त्याच्यातील दोषांची जाणीवही असणे महत्त्वाचे आहे. कोणतेही काम करत असताना प्रत्येक व्यक्तीने भविष्यातील चांगल्या आणि वाईट परिणामांचा विचार केला पाहिजे. आपल्या कृतीतून आपल्या कुटुंबातील व्यक्ती, समाज यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जीवनात प्रत्येक समस्येवर उपाय असतो पण तो शांत, संयमाने शोधता आला पाहिजे काही वेळेला समस्या वेळेनुसार, प्रसंगानुसार आणि परिस्थिती अनुरुप आपोआप सुटतात. त्यासाठी मानवाकडून कोणत्याही अतिरेकी वर्तनाची गरज नसते.
जसे जेवणातील मीठ असले तरी अस्तित्व सांगता येत नाही पण नसले तर तीव्र उणीव जाणवते. जीवनातील समस्या ही मीठाप्रमानेच असते जर समस्या नसेल तर जीवनाची किंमत कळत नाही आणि समस्या तीव्र असेल तर आयुष्याचा प्रवास खडतर आणि नकोसा वाटतो. समाजात प्रत्येक व्यक्तीने समस्या अत्यंत विचारपूर्वक, संयमाने, कुशलतेने, परिस्थितीची जाणीव ठेवून,आपल्या व्यक्तींची काळजी घेऊन सोडवली पाहिजे. क्रोध, मान, माया, लोभ या चौकटी पासून दूर राहावे जो व्यक्ती या चौकटीत अडकतो त्याला सुख आणि समाधान मिळत नाही.
‘अति तेथे माती’ ही म्हण पूर्वीपासून खूप प्रचलित आहे. कारण अशा प्रकारची माणसे समाजात पाहायला मिळतात कलाकाराने अत्यंत प्रबोधनात्मक आणि व्यक्ती हिताच्या पैलूतून समाजाला संदेश दिलेला आहे. व्यक्तीने स्वतःच्या जीवनात बौद्धिक, मानसिक, सामाजिक, शारीरिक, भावनिक समतोल राखून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत समस्येची उकल करावी. काहीवेळा समस्या वेळेनुसार सुटतात त्यासाठी संयम बाळगावा असे तार्किक वर्णन कलाकाराने चित्रातून व्यक्त केले आहे.
” असावे समाधान चित्ती
नसावी हाव अतिरेकी
प्रत्येकच गोष्टीची थोडक्यात गोडी
कारण अति तेथे माती ”
.चित्र सौजन्य-यशवंत निकवाडे,शिरपूर
चित्र भावार्थ सौजन्य-प्रा डॉ.ज्योती रामोड, पुणे