DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार:- शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी व माजी मंत्री आमदार ऍड. के. सी. पाडवी यांनी नुकतीच भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. दरम्यान तत्पूर्वी आमदार राजेश पाडवी यांनीही भेट दिली.
घोडलेपाडा येथील भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले जवान मेजर रमेश वसावे यांना राजस्थान मधील अजमेर जवळ वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्यावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांच्या मृत्युने त्यांचे कुटुंब अजूनही दुःखातून सावरलेले नाही. शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी अनेक जण भेटी देत आहेत. नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी व माजी आदिवासी विकास मंत्री आमदार ऍड के. सी. पाडवी यांनी नुकतीच घोडलेपाडा येथे येवून शहीद जवान वसावे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यावेळी शहीद जवान रमेश वसावे यांच्या पत्नी, मुले, भाऊ, भगिनी,त्यांच्या मातोश्री यांचेशी चर्चा करून आस्थेवाईक पणाने विचारपूस केली. शासनाचे विविध लाभ, तसेच मुलांच्या शिक्षणाविषयी , पत्नीच्या नोकरीविषयी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, काँग्रस चे ज्येष्ठ नेते दिलीप नाईक, काँगेस चे तालुकाध्यक्ष डॉ. सुरेश नाईक, मंदाणे येथील सातपुडा उद्योग समूहाचे संचालक प्रकाश पवार उपस्थित होते.
*आमदार राजेश पाडवी यांचीही भेट*
आमदार राजेश पाडवी यांनी ही नुकतीच घोडलेपाडा येथे येवून शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांचे समवेत पंचायत समितीचे सदस्य श्रीराम पाटील हे उपस्थित होते.