नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संपादकीय……..

दर्शन पोलीस टाईम

संपादकीय……….

दि. 31.10.2022

स्वागत आहेच आणि अपेक्षा देखील…

बदली हे प्रशासकीय सेवेतील अविभाज्य अंग आहे किंबहुना एक शाश्वत बाब असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या बदलीला अनेक कांगोरे असतात. ती कधी एक प्रशासकीय बाब असते तर कधी शिक्षा! कधी सोय असते तर कधी अडवणूक असे अगणित अन्वयार्थ बदलीचे काढता येतात. प्रशासकीय अधिकारी मात्र या परिस्थितीला चांगलेच सरावलेले असतात. जशी या बदल्यांची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होते तशी या बदल्यांची उत्सुकता जनतेत देखील असते. नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याविषयी त्यांच्या काही कल्पना असतात आणि खूप साऱ्या अपेक्षा असतात. याचा अर्थ असा नाही की आधीचा अधिकारी वाईट असतो. काही तसे असतात देखील मात्र धुळ्याचे मावळते पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही. प्रत्येक अधिकारी आपल्या परीने योगदान देत असतो. प्रवीणकुमार पाटील यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्यांच्या लोकाभिमुख कारभार करण्याच्या कार्यशैलीने जनतेवर चांगलीच छाप पडली आणि त्यांना जनतेचे प्रेम देखील मिळाले. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि लगेचच काही दिवसात त्यांची बदली झाल्याची बातमी येऊन धडकली.
कार्यक्षम अधिकाऱ्याची बदली झाल्याने काहीशी नाराजी व्यक्त होणे स्वाभाविक होते. ती एकप्रकारे जनतेने दिलेली केलेल्या कामाची पावतीच म्हणावी लागेल. या पार्श्वभूमीवर धुळ्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून संजय बारकुंड यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त असलेले संजय बारकुंड पदोन्नतीने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले आहेत. तेव्हा त्यांची बदली होणे ही त्यांच्यासाठी शुभ वार्ताच होती. राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती या २०१९-२० पासून रखडलेल्याच होत्या. पदोन्नती चा मार्ग मोकळा झाल्याने भारतीय पोलीस सेवेत येत संजय बारकुंड आता नव्या जबाबदारी साठी सज्ज झालेले आहेत.
वर नमूद केल्याप्रमाणे कुठलाही अधिकारी बदली होऊन येतो तेव्हा जनतेच्या त्यांच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात. नवीन पोलीस अधीक्षक देखील त्याला अपवाद नाहीत. धुळ्यात समस्या काही नव्या नाहीत. दोन राज्यांच्या सीमेवर असलेला धुळे जिल्हा हा अवैध धंद्यांसाठी नेहमीच कुप्रसिद्ध राहिला आहे. गुटखा किंग, मद्यसम्राट, पिस्तुलबाज ही विशेषणे घेऊन अनेक सराईत गुन्हेगार आपला धाक नेहमीच दाखवत असतात. त्यांच्या विरुध्द कारवाई देखील होते मात्र त्यांचा कायमचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. गुन्हेगारी विश्व किती व कसे आहे याचा आढावा माननीय अधीक्षकांना पहिल्या बैठकीला आलाच असेल. आता ते पोलीस दलाचे नेतृत्व करत असतांना याविरुद्ध काय पाऊले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय सामान्यांच्या दृष्टीने अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांच्या गळ्यातले मंगळसूत्र घेऊन, मोबाईल घेऊन धूम स्टाईलने फरार होणारे भुरटे चोर! यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. या प्रकारांची अनेकांनी धास्ती घेतली आहे. याबाबतीत हे गुन्हेगार इतके निर्ढावलेले आहेत की समोरच्याला इजा करायला देखील ते घाबरत नाहीत. अश्या प्रकारच्या चोऱ्यांचे अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असतात. धुळ्यात अशा घटनांना पायबंद घालणे तसेच याविषयी लोकांमध्ये असलेली भीती दूर करणे गरजेचे आहे. ही झाली आपल्या आजूबाजूची परिस्थिती याशिवाय सायबर क्राईम हा प्रकार दिवसेंदिवस वाढतांना दिसतो आहे. काळजीची बाब म्हणजे लोकांमध्ये याविरोधात तक्रार कुठे करावी यापासून अशा घटना आपल्यासोबत घडू नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अजिबात जागृती नाही. समाजमाध्यमांमुळे या घटनांना खतपाणीच मिळत आहे. नव्या पोलीस अधीक्षकांनी लोकांत येऊन जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न केले तर या सर्व प्रकारांना निश्चितच आळा बसेल. धुळे शहरावर दंगलीचा देखील डाग आहे तेव्हा शांतता काळात केलेले काम कठीण काळात मदतीला धावून येते तेव्हा आपले कर्तव्य पार पाडत असतांना ‘लोकाभिमुखता’ किती महत्वाची आहे हे लक्षात येते. पोलीस दलात बेशिस्ती खपवून घेतली जात नाही याचा प्रत्यय प्रवीणकुमार पाटील यांच्या कारकिर्दीत आलाच होता. गैरवर्तवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करत त्यांनी सामान्यांना आश्वस्त केले होते. याविषयी नवीन पोलीस अधीक्षक देखील तितकेच सजग असतील ही अपेक्षा!
तसेच अजून महत्वाचे म्हणजे नूतन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना सायकलिंग चा छंद आहे. आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त आपले ‘असणे’ देखील खूप काही सांगून जाणारे आहे. सायकलिंगच्या अनेक स्पर्धांत त्यांनी यश मिळवले आहे. पोलीस दलासाठी आवश्यक असणारी शारिरीक सुदृढता आणि कणखर मानसिकता टिकविण्यासाठी खूप मेहनत करणे हे ओघाने आलेच आणि त्याचे छंदात रुपांतर करून संजयजी सायकलिंग च्या स्पर्धाविश्वात नव्या आव्हानांना सामोरे जाऊ इच्छितात.
नवीन पोलीस अधीक्षक कोण आहेत, कसे आहेत, त्यांच्या पुढची आव्हाने काय आहेत हे सांगितल्यानंतर त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा आहेतच. ज्याप्रमाणे एक चांगला सायकलपटू हा सहनशक्ती, ताकद, वेग आणि स्पर्धेच्या शेवटपर्यंत आपले बळ टिकवून ठेवणारा म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपली ही धुळ्यातील कारकीर्द असावी ही सर्व जनतेला अपेक्षा आहे. आपले पद हे शक्तिशाली पद आहे पण जबाबदारीचे हे पद नेहमीच संयमाची परीक्षा बघत असते. तेव्हा ताकद आणि सहनशक्तीचा मिलाफ आपल्यात असावा. गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे आपण असावे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरंभशूर न होता शेवटपर्यंत आपले बळ टिकवत अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करावी. तेव्हा दर्शन पोलीस टाईम च्या परिवारातर्फे धुळे जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षकांना आपल्या पुढील कारकिर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

Dhule
12:14 pm, December 23, 2024
26°
टूटे हुए बादल
Wind: 3 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:04 am
Sunset: 5:55 pm
Translate »
error: Content is protected !!