DPT News Network हुबळी ः ‘सरल वास्तू’च्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी हुबळी येथील हॉटेलमध्ये चाकूने वार करून हत्या करण्यात आली. चंद्रशेखर हॉटेलमध्ये कोणाला तरी भेटायला गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. रिसेप्शनजवळ चंद्रशेखर यांच्यावर वार होत असल्याचे यात दिसत आहे.
चंद्रशेखर यांच्यावर हल्ला होत असल्याचे पाहून हॉटेलमधील काही कर्मचार्यांनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला.
काल दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रशेखर यांना हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये दोन व्यक्ती भेटायला आल्या. चंद्रशेखर सोफ्यावर बसताच दोघांनी त्यांना नमस्कार केला. एक त्यांच्या पाया पडला. त्यानंतर दोघांनी चंद्रशेखर यांच्यावर चाकूने सपासप वार सुरू केले. पुढच्या काही मिनिटांमध्ये चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर, मारेकर्यांनी पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त लाभू राम घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा आढावा घेत त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला.