भंडारा : पाण्याची बाटली घेण्यासाठी बसमधून खाली उतरणं एका पुणे येथील सराफा व्यापाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. सराफा व्यापारी बसमधून खाली उतरताच चोरट्यांनी बसमधून सोन्याची बिस्किटे असलेली बॅग लंपास केली. सदरील घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली बसस्थानकावर घडली. बॅगमध्ये 25 लाख 93 हजार रुपये किमतीचे 471 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 4 लाखाची 82 ग्रॅम सोन्याची बिस्किटे होती. याप्रकरणी सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राजेंद्रसिंग जसवंतसिंग राठोड वय 24 वर्ष (रा. नागाने, राजस्थान) असे या सराफा व्यावसायिकाचे नाव असून ते पुणे येथील भवरलाल त्रिलोकचंद अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये कार्यरत आहे. 30 मे रोजी जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व बिस्किटे घेऊन राठोड हे प्रवासासाठी निघाले होते. दरम्यान रायपूर, राजनगाव, बालाघाट आणि गोंदिया येथील सराफांना दागिने देऊन गोंदियावरून ते भंडारा येथे जाण्यासाठी सायंकाळी बसमध्ये बसले.
रात्री 7 वाजताच्या सुमारास बस साकोली बसस्थानकावर आली. तहान लागल्याने बॅग बसमध्येच ठेवून पाण्याची बाटली घेण्यासाठी राठोड खाली उतरले असता, चोरट्यांनी संधी साधत बसच्या आसनावर ठेवलेली बॅग लंपास केली. दरम्यान, बसमध्ये परत आल्यानंतर राठोड यांना आपली बॅग चोरी झाल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी बसमधून उतरून याची माहिती तत्काळ आपल्या मालकाला फोन करुन दिली.
याप्रकरणी साकोली पोलिसांनी संपूर्ण चौकशी करून रात्री उशिरा गुन्हा नोंदविला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या चमू रवाना करण्यात आले असून तक्रारीनंतर राठोड यांना पोलिसांनी साकोलीत थांबवून घेतले. दरम्यान, राठोड याचीही चौकशी पोलीस करत आहेत.