DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- संदिप अहिरे
धुळे:- दि. 1 जुलै 2025 – धुळे शहरातील आझादनगर परिसरात झालेल्या दुकानफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत, अवघ्या तीन तासांत आरोपीला अटक करण्यात आली आहे. आझादनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
फिर्यादी जयेश गणेश सोनार (वय ३७, रा. सुभाष नगर, जुने धुळे) यांनी आपल्या “योगीराज ग्राफिक्स” नावाच्या दुकानात झालेल्या चोरीबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दुकान बंद असताना, अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील १०,००० रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती फिर्यादीने दिली होती.
या तक्रारीवरून पोलिसांनी 1 जुलै रोजी दुपारी 3.16 वाजता गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि तेथील CCTV फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसणाऱ्या संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी गुप्त बातमीदारांची मदत घेण्यात आली. त्यातून आरोपीचे नाव सद्याम रशीद शेख ऊर्फ बोबडया दादा (रा. आझादनगर, वडजाई रोड, धुळे) असे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तत्काळ ८० फुटी रस्त्यावरील हनुमान मंदिरामागील मोकळ्या जागेत आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी आरोपी तेथे मिळून आला. पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशातून चोरीस गेलेल्या रकमेपैकी ५,००० रुपये (५०० रुपयांच्या १० नोटा) हस्तगत करण्यात आले.
या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०५, ३३१(४), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस हवालदार मनोज बागुल करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, व पोलीस उप अधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोनि. निवृत्ती पवार, पोसई समाधान सुरवाडे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी केली. या पथकात पोहेकॉ. गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, शांतीलाल सोनवणे, रफिक पठाण, मनोज बागुल, विजय शिरसाठ तसेच पोकॉ. अनिल शिंपी, मक्सुद पठाण आणि पंकज जोंधळे यांचा समावेश होता.



