🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – कनोज शिकलगार
इचलकरंजी :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडहिंग्लज कार्यालयाने गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत एक चारचाकी वाहनासह एकूण१०,५३,४४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालक अमोल नंदकुमार सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागास १७ जुलै २०२६ रोजी अडकूर-नेसरी मार्गावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बॉजुर्डी गावाच्या हद्दीतील नेसरी-अडकूर रस्त्यावर, बॉजुर्डी बसथांब्याजवळ सापळा रचण्यात आला.
दरम्यान संशयित टाटा सुमो गोल्ड (क्र.GA-07-G-5520) हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे २५ बॉक्स आढळून आले. जप्त मद्याची किंमत २,५३,४४०, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची अंदाजित किंमत ८,००,००० असून एकूण १०,५३,४४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक स्नेहलता नरवणे,उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, आर. सी. केरीपाळे, तसेच जवान एस. एम. पाटील, भरत सावंत, संदीप चौगुले, महिला जवान स्वप्नाली बेडगे आणि वाहनचालक अविनाश परीट यांनी कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. सी. केरीपाळे करीत आहेत.



