DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, भिवापूर येथे “एक पेड मॉ के नाम 2.0” या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत एकता नगर परिसरात विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त सहभागातून तब्बल १७० वृक्षांची लागवड करण्यात आली. आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने आईच्या नावाने रोपांची लागवड केली.
कार्यक्रमात मुख्याध्यापिका ज्योती लांबट यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, निसर्गप्रेम, पालकांचा सन्मान, आणि वृक्षारोपण ही एक सामाजिक जबाबदारी कशी आहे यावर मार्गदर्शन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर पालक व शिक्षकवृंदानेही सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल (पो. स्टे. भिवापूर), मयुर काकडे, राजू महाकाळकर, संचालक प्रमोद रघुशे, प्रशासकीय अधिकारी देवेंद्र गोवर्धन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शितल रघुशे, वर्षा बोराडे, प्रतिक्षा रेहपाडे, रागिणी वाघमारे, गीता लांजेवार यांनी विशेष मेहनत घेतली.
हा उपक्रम पर्यावरण जागृतीसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पालकांविषयी आदराची भावना रुजवणारा उपक्रम ठरला आहे.



