✡️ राजु पारवे यांच्या प्रयत्नांना यश
DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी:- अमर मोकाशी

(फोटो – वसतिगृहाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करतांना सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, माजी आमदार राजु पारवे, तहसीलदार बाबासाहेब टेळे)
भिवापूर :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या निवासाची अडचण लक्षात घेऊन भिवापूर येथे नव्या शासकीय वसतिगृहाची स्थापना करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी गुरुवारी भिवापूर येथे भेट देत प्रस्तावित वसतिगृहासाठी निवडलेल्या जागेची पाहणी केली. या वेळी माजी आमदार राजू पारवे, तहसीलदार बाबासाहेब टेळे, पं.स. चे माजी उपसभापती राहुल मसराम उपस्थित होते.
भिवापूरसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना निवास व भोजनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी या कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहतात. वसतिगृह उपलब्ध झाल्यास सुरक्षित निवास, पौष्टिक आहार, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि शैक्षणिक साहित्य अशा मूलभूत सुविधा मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
या वसतिगृहासाठी तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या वन विभागाच्या मालकीच्या जमिनीतून दोन हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रस्ताव समाज कल्याण व वन विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, माजी आमदार राजू पारवे यांनी समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन भिवापूर येथे वसतिगृहाची मागणी केली होती हे उल्लेखनीय. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली.



