DPT NEWS NETWORK🗞️ 📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- संजय दिंडे
कोल्हापूर:- गणेश मूर्तींचं नदी, तलाव, विहीरीत विसर्जन करू नये, तर महापालिकेनं निर्माण केलेल्या कृत्रिम तलावात मूर्तीचं विसर्जन व्हावं.मंडळांनी ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार, तसंच साऊंड सिस्टिममध्ये प्रेशर मीड तंत्राचा वापर करू नये, ट्रॅक्टरवर नाचण्यासाठी बेस तयार करता येणार नाही, अशा प्रकारच्या सूचना कोल्हापूर जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी मंडळांचे पदाधिकारी, डिजे ऑपरेटर यांच्या बैठकीत दिल्या.
कोल्हापुरात गणेशोत्सवात डॉल्बी सिस्टिमचा वापर होवू नये, तसेच मंडळांनी आचारसंहितेचं पालन करावं, या उद्देशानं पोलिस दलानं वारंवार बैठका घेवून, मंडळांच्या पदाधिकार्यांचं प्रबोधन केलं. मात्र राजारामपुरीत बुधवारी निघालेल्या गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान या सर्व नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आले.या अनुषंगानं आज पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. या बैठकीला शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, डीजे सिस्टिम आपरेटर यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस अधीक्षकांनी सूचना आणि मार्गदर्शन करताना, डीजे लावून ध्वनी पातळी मर्यादेचं उल्लंघन झाल्यास खटले दाखल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. यासोबतच चालक, मालक आणि मंडळांच्या पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल होतील. डीजे साऊंड सिस्टिममध्ये प्रेशर मीड तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळं कानाचे पडदे फाटणे किंवा बहिरेपणा येण्याची दाट शक्यता असते. तसंच हृदयावर अतिरिक्त ताण येतो. यासोबतच डीजेसमोर सीओटू गॅसचा वापर करू नये. प्रत्येक मंडळांनी ट्रॅक्टरच्या बोनेटवर किंवा समोर नाचण्यासाठी बेस तयार करू नये. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचं विसर्जन नैसर्गीक स्त्रोत म्हणजेच नदी, तलाव, विहरी, झरे यामध्ये न करता, महापालिका प्रशासनानं उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावामध्ये केलं जावं, अशा सूचना केल्या. हा उत्सव शांततेत, उत्साहात, कायदा सुव्यवस्था राखून साजरा करावा, असं आवाहन पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी केलं. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, गृहपोलिस उपअधीक्षक तानाजी सावंत, निरीक्षक रविंद्र कळमकर, श्रीराम कन्हेरकर, संजीव झाडे, सुशांत चव्हाण, संतोष डोके, भाजपाचे महेश जाधव, गायत्री राऊत, पिंटू काटकर यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी, साऊंड ऑपरेटर उपस्थित होते.



