DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शाहुवाडी तालुक्यात मोठी कारवाई करत गोवा बनावट दारूचा तब्बल १ कोटी ४ लाख ५६ हजार ३२ रुपयांचा साठा तसेच आयशर ट्रकसह एकूण १ कोटी १६ लाख ६१ हजार ३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी संतोष बंडू पेटकर (रा. शिराळा नाका, इस्लामपूर, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
कारवाईचा तपशील :
दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना बातमी मिळाली की, आयशर ट्रक (क्र. MH 18-BA 8511) हा गोवा बनावटीची विदेशी दारू भरून रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे येत आहे. पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारुळ गावाजवळ सापळा लावण्यात आला.
ट्रक थांबवून तपासणी केली असता, चालक संतोष पेटकर हा टाळाटाळ करू लागला. संशय बळावल्याने ट्रकची तपासणी केली असता खालीलप्रमाणे मोठ्या प्रमाणात गोवा बनावट दारू आढळून आली :
पोलांड प्राईड रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 237 बॉक्स (11,376 नग) – किंमत ₹10,23,840/-
पोलांड प्राईड ऑरेंज व्होडका (180 मिली) – 253 बॉक्स (12,144 नग) – किंमत ₹21,61,632/-
पोलांड प्राईड प्रिमीयम कलेक्शन रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 372 बॉक्स (17,856 नग) – किंमत ₹30,35,520/-
त्याच कंपनीची रिझर्व व्हिस्की (180 मिली) – 223 बॉक्स (10,704 नग) – किंमत ₹18,19,680/-
त्याच कंपनीची रिझर्व व्हिस्की (750 मिली) – 296 बॉक्स (3,552 नग) – किंमत ₹24,15,360/-
👉 एकूण १,३८० बॉक्समधील दारूची किंमत ₹१,०४,५६,०३२/- एवढी आहे.
ट्रकसह हा सर्व माल जप्त करून एकूण मुद्देमालाची किंमत ₹१,१६,६१,०३२/- एवढी झाली आहे.
आरोपी व गुन्हा :
तपासाअंती हा ट्रक प्रल्हाद लिंबा धनगर (रा. शिरपूर, जि. धुळे) याचा असल्याचे उघड झाले. आरोपी संतोष पेटकर हा त्याच्याकडून ट्रक घेऊन दारूची वाहतूक करीत होता. दोघांविरुद्ध शाहुवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शाहुवाडी पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांची माहिती :
ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक योगेश कुमार तसेच अपर पोलिस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलिस निरीक्षक सागर वाघ, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलिस अमंलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, रोहित मर्दाने, सतिश सुर्यवंशी, संजय पडवळ आणि अमर वासुदेव यांनी केली.
👉 या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



