DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी: राजेंद्र पवार
मिरज :- मिरज शहर पोलिस ठाणे हद्दीतील एका शाळेजवळ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजी हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय मुलामध्ये झालेल्या वादामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजातील काही जण एकमेकांविरोधात जमले होते. तथापि, पोलिस प्रशासनाने वेळेत हस्तक्षेप करत कोणताही अनुचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात आणली. मिरज शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शांतता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, तसेच दंगल नियंत्रण पथकातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. सुमारे ४०० पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी हजेरी लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. घटनेत संबंधित दोन्ही पक्षांकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून, पोलिस तपास सुरू आहे. दरम्यान, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पोलिस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, समाजप्रमुख व नागरिक सहभागी होणार असून, शहरात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. सांगली जिल्हा पोलिस दलाने सर्वांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या अफवा, फोटो, व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.



