DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम
🚨 प्रतिनिधी : प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर :- चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या हक्काचे येणे मिळवून देण्यासाठी, थकीत एफ आर पी असलेल्या एकूण 27 कोटी रु मागणीसाठी व यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल जाहीर केल्याशिवाय ऊसाचे कांडे तोडू द्यायचे नाही अशा विविध मागण्यासाठी निवेदन दिलेले असतानाही कारखाना प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्याकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागणीसाठी मंगळवारी पाटणे फाटा येथे दुपारी 12 ते 5.30 या काळात रास्ता रोको आंदोलन केले.
👆पोलिस-शेतकरी यांच्यात झटापट :
पाटणे फाटा येथे रास्ता रोको आंदोलनास सुरुवात होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी सर्व सामान्यांना प्रवास अडथळा होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी आंदोलन कर्त्यांना रस्ता मोकळा करा असे सांगितले असता आंदोलकांनी आमची देणी घेतल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून हटणार नाही अशी भूमिका घेतली परिणामी वातावरण तणावाचे झाले. शाब्दिक झटापटी, अरेरावी यातून पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्ते राजेंद्र गड्यांणावर व अन्य शेतकऱ्यांना जबरदस्ती धरपकड करून, अंगावर धावून जाऊन पोलीस वाहनात कोंबळे व त्यांना जबरदस्ती चंदगडला हलवले त्यामुळे वातावरण अधिक चिघळले.दरम्यान प्रा दीपक पाटील यांनी अतिशय संयमाने शेतकरी आंदोलकांना एकत्र करून माजी खासदार राजू शेट्टी पाटणे फाटा येथे येईपर्यंत खिंड लढवली.
👆हिंमत असेल तर अवैध धंदेवाल्याना पकडा-
आम्ही शेतकरी आहोत, आमच्या घामाचे हक्काचे पैसे मागण्यासाठी सनदशीर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करीत आहोत. आमची धरपकड काय करता, हिंमत असेल तर अवैध दारुवाले, मटकावाले, गुंड,यांना पकडा,शेतकऱ्यांना फसविणाऱ्या साखर कारखानदारांना बेड्या खाला, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांना दादागिरी करू नका. तुम्हाला शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा तळतळाट लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी आंदोलकातून उलटत होत्या.
👆माझी खासदार राजू शेट्टी आंदोलन स्थळी दाखल.
दरम्यान दुपारी 4.20 वा शेतकरी नेते राजू शेट्टी राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना घेऊनच पाटणे फाटा आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यातील आंदोलक शेतकऱ्याना संबोधताना त्यांनी सांगितले, शेतकऱ्यांची मुले असाल, जातिवंत शेतकरी असाल तर ऊसतोड घेऊ नका. थकीत एफ आर पी व ऊस दर जाहीर झाल्यावरच ऊस तोडीला परवानगी द्या असे सांगितले.तसेच मा उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 2022-23 ते 2024-2025 मधील एफ आर पी तील फरकाची रक्कम ओलम राजगोळी, अथर्व दौलत हलकर्णी, इको केन म्हाळुंगे, आजरा व गोड साखर या कारखान्याकडून थकवली आहे. ही 27 कोटी रक्कम व चालू गळीत हंगामातील पहिली उचल जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करू देऊ नका, ऊसाची एक ही गाडी कारखान्याकडे जाणार नाही याची दक्षता घ्या, आणि या आंदोलनाला प्रामाणिकपणे साथ द्या अशी हाक दिली.
दौलत अथर्व प्रशासनाने कामगार नेते डॉ उदय नारकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांना उद्देशून शेट्टी म्हणाले, त्यांना हात लावून दाखवा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकत काय आहे ती दाखवून देतो असे ठणकावून सांगितले.
👆राजेंद्र गड्ड्यानावर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक-
राजकारण आमचा धंदा नाही, पण चंदगड च्या जनतेने मतातून मला खूप काही दिले आहे त्याचे ऋण फेडण्याची हीच वेळ असल्याचे सांगून शेतकऱ्यांना घामाचे मोल मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल मला आपण साथ द्यावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
👆पोलीस आणि तहसील प्रशासनाची असंवेदनशीलता-
पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याने प्रा दीपक पाटील यांनी प्रशासनाचा निषेध करून तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर तानाजी देसाई म्हणाले थकीत रक्कम बुडविणाऱ्या कारखानदारांना प्रथम बेडया घाला मग आमच्याकडे या असे ठणकावून सांगितले तसेच दौलतच्या कामगारांना न्याय मिळवून द्या, चंदगड मधील शेतकऱ्यांना कोणी वाली नाही त्यांच्या पाठीशी शेट्टी साहेबांनी उभे राहावे अशी मागणी केली.
चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण आंदोलन स्थळी उपस्थित होते. मात्र पोलीस आंदोलन मोडीत काढत असताना त्यांनी संवेदनशीलता दाखवून आंदोलक व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा घडवून प्रश्न सोडविणे अपेक्षित असताना त्यांनी याबाबत ध्रुतराष्ट्र भूमिका घेतल्याने त्यांचाही यावेळी निषेध करण्यात आला.
पाटणे फाटा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेल्या रास्ता रोको आंदोलनात राजेंद्र गड्ड्यानावर, प्रा दीपक पाटील,माजी सभापती जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, सतीश सबनीस, शशिकांत रेडेकर, धनाजी पाटील, सखाराम केसरकर, विश्वनाथ पाटील,नवनीत पाटील, शिवाजी भोगण, वैजू भोगण, मलकू पाटील, राजेंद्र पाटील, विरुपाक्ष कुंभार सह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.



