DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी योगेश गवळे
निफाड )— निफाड पोलिसांनी केवळ पाच तासांच्या आत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला.
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास नांदुर्डी शिवारातील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी एका अज्ञात इसमाने जबरीने हिसकावून चोरली होती. फिर्यादी महिला आपल्या घरामागे नळाचे पाणी भरत असताना अज्ञात व्यक्तीने पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करत तिच्या गळ्यातील सोनसाखळी (मन्याची पोत) खेचून मोटारसायकलवरून पळ काढला. या घटनेनंतर फिर्यादीने निफाड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३६८/२०२५ भा.दं.वि. कलम ३९२ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. के. के. पाटील यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
त्या अनुषंगाने निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम, पो.हवा. अनिल शेरेकर, पो.हवा. भास्कर पवार, पो.ना. नितीन सांगळे, पो.शि. विनोद जाधव, पो.शि. राजू दरोडे, पो.शि. धनंजय जाधव, पो.शि. सिद्धार्थ वाघ, महिला पो.ना. ललिता कोकणे, महिला पो.हवा. पुनम शिंदे या तपास पथकाने जलद गतीने तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील तसेच निफाड शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयास्पद आरोपीचा चेहरा ओळखला. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सचिन सुदाम ठेपले (रा. नांदुर्डी रोड, निफाड) या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याची साखळी, वापरलेले कपडे आणि गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या ५ तासांत हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस अटक केली.
या यशस्वी कारवाईचे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय अधिकारी श्री. के. के. पाटील यांनी पोलिस दलाचे कौतुक केले आहे. निफाड पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत असून, या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
🔸 “पोलिसांनी दाखवलेले तत्पर तपासकौशल्य व समन्वयामुळे आरोपीला लवकर पकडता आले. अशा जलद कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.
👉 निफाड पोलिसांची ही कारवाई जिल्हा पोलीस दलासाठी एक आदर्श ठरली आहे.



