⭐गहाळ पिशवीतील मोबाईल व महत्त्वाची कागदपत्रे महिलेला सुरक्षित परत⭐
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – उमेश महाजन
जळगाव:- पाळधी महामार्ग पोलिसांची प्रामाणिकता आणि सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित करणारी घटना पाळधी महामार्ग पोलीस केंद्राच्या हद्दीत घडली आहे.
दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 4.00 वाजता महामार्ग पोलीस केंद्र पाळधी येथील अंमलदार एरंडोल–पारोळा महामार्गावर दैनंदिन पेट्रोलिंग व मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करीत असताना धारागीर गावाजवळ रस्त्याच्या कडेला पडलेली एक प्लास्टिकची पिशवी पोलीस अंमलदार संदीप पाटील यांच्या निदर्शनास आली.
सदर पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये एका महिलेचे आधार कार्ड, मोबाईल फोन तसेच बसचे तिकीट आढळून आले. मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न केला असता तो कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे पिशवी कोणाची असावी, याचा शोध घेण्यास पोलिसांनी तात्काळ सुरुवात केली.
आधार कार्डवरील माहितीनुसार संबंधित महिला मंगलबाई राजेंद्र पाटील (रा. वडगाव, ता. पाचोरा) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्या वडगाव येथून जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. घरी परत जात असताना बस प्रवासादरम्यान त्यांची पिशवी गहाळ झाली होती.
त्यानंतर दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी महिलेचा मुलगा भूषण पाटील यांची योग्य खात्री करून मोबाईल फोन व इतर कागदपत्रे सुरक्षितपणे त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ही संपूर्ण कामगिरी महामार्ग पोलीस केंद्र पाळधीचे प्रभारी अधिकारी निलेशकुमार संदानशिव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे. दीपक कोळी, सलीम तडवी, सुनील साळुंखे, पोका. सुनील नाईक, अभिलाष सूर्यवंशी तसेच चालक संदीप पाटील यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
महामार्ग पोलिसांच्या या माणुसकीच्या, तत्पर आणि प्रामाणिक कार्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिस दलाच्या प्रतिमेला सकारात्मक उंची मिळाली आहे.



