DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी : गौतम दिवाण आळते
कोल्हापूर:- इतिहास घडवणारी कामगिरी इंडियन मिलिटरी अकॅडमी (आयएमए)च्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच टेरिटोरियल आर्मीमधून पास आऊट होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून लेफ्टनंट सई जाधव यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
कोल्हापूरच्या कन्येचा देशाला अभिमान
कोल्हापूर जिल्ह्याची कन्या व जयसिंगपूर येथील रहिवासी असलेल्या लेफ्टनंट सई जाधव यांनी अवघ्या २३ व्या वर्षी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीचे कठोर सैनिकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून टेरिटोरियल आर्मीमधून लेफ्टनंट पदाचे कमिशन मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढला आहे.
तरुणींसाठी प्रेरणादायी आदर्श
या सत्कारप्रसंगी संजय घोडावत एज्युकेशन कॅम्पसचे चेअरमन संजय घोडावत यांनी सांगितले की, “लेफ्टनंट सई जाधव यांचे यश हे वैयक्तिक मर्यादेत न राहता देशातील तरुणींसाठी प्रेरणादायी आहे. देशसेवा, महिला सक्षमीकरण आणि युवकांना दिशा देणारा आदर्श त्यांच्या वाटचालीतून निर्माण झाला आहे.”
विद्यार्थिनींना दिला प्रेरणादायी संदेश सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट सई जाधव म्हणाल्या, “संजय घोडावत शैक्षणिक संकुलाने दिलेल्या सन्मानाबद्दल मी मनापासून आभारी आहे. माझे गाव आणि संजय घोडावत यांचे गाव एकच जयसिंगपूर असून, माझ्याच गावात असा भव्य सत्कार होत आहे, याचा मला विशेष अभिमान आहे. येथे उपस्थित विद्यार्थिनींपैकी एक जरी मुलगी आर्मीमध्ये अधिकारी झाली, तर माझा हा सत्कार सफल झाल्याचे मी मानेन.”
सामाजिक कार्यांची गौरवशाली परंपरा
संजय घोडावत फाउंडेशन समाजसेवेच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना सहाय्य, आरोग्यविषयक उपक्रम, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना मदत, पूरग्रस्तांसाठी मदत तसेच कोरोना काळात गरजू नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्याची परंपरा फाउंडेशनने जपली आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या गौरव सोहळ्यास चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सुस्मिता मोहंती, विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, लेफ्टनंट सई जाधव यांचे वडील मेजर संदीप जाधव, डॉ. सीमा नेगी, इंटरनॅशनल स्कूलचा संपूर्ण स्टाफ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



