DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – संजय दिंडे कोल्हापूर
कोल्हापूर:- सातबारा पत्रकावर नाव लावण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडलधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. कुलदीप शिवराम जनवाडे (वय ४७) असे या आरोपी लोकसेवकाचे नाव असून, तो कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथे मंडलधिकारी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदाराची अर्जुनवाडा येथील गट क्रमांक ४७९ मध्ये शेतजमीन आहे. या जमिनीच्या सातबारा पत्रकावर नाव नोंदवण्यासाठी तक्रारदार हे कसबा वाळवे येथील मंडल अधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी जनवाडे याने तक्रारदाराच्या स्वतःच्या नावासाठी ७,००० रुपये आणि तक्रारदार पाठपुरावा करत असलेल्या गावातील इतर ४ प्रकरणांसाठी २०,००० रुपये अशा एकूण २७,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी १९ डिसेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
एसीबीचा सापळा आणि कारवाई
मिळालेल्या तक्रारीनुसार, एसीबीच्या पथकाने १९ आणि २० डिसेंबर रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. आज, २३ डिसेंबर २०२५ रोजी सापळा लावण्यात आला. यावेळी मंडलधिकारी जनवाडे याने तक्रारदाराकडून ठरलेली २७,००० रुपयांची रक्कम स्वीकारताना त्याला पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.
पुढील कारवाई सुरू
घरझडती: आरोपी कुलदीप जनवाडे याच्या फुलेवाडी रिंग रोड (कोल्हापूर) येथील घराची झडती घेण्यासाठी एसीबीचे पथक रवाना झाले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीचा मोबाइल आणि कार्यालयातील कागदपत्रे तपासासाठी जप्त करण्यात आली आहेत. राधानगरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर, एएसआय प्रकाश भंडारे, हेड कॉन्स्टेबल विकास माने, सचिन पाटील आणि उदय पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.सरकारी कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



