DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी पांडुरंग माने
सोलापूर:- मौजे उक्कडगांव ता. बार्शी येथील सर्जेराव मुंढे यांचा पुतण्या महादेव बाजीराव मुंढे यांनी दिनांक- 27/01/2020 रोजी शेतातील बोअरमधील पाणी घेणेचे वादातून उक्कडगांव येथे बाबुराव सांगळे यांचे घरासमोर लाईटपोल जवळ डोक्यात दगड घालून सर्जेराव मुंढे यांना जिवे ठार मारले या घटनेबाबत मयताची पत्नी इंदूबाई सर्जेराव मुंढे यांनी साक्षीदार श्रीकांत मुंढे यांचे सांगणेप्रमाणे फिर्याद पांगरी पोलीस स्टेशनला दिली. त्या फिर्यादीमध्ये फिर्यादी इंदुबाई यांनी नमुद केले की, दिनांक- 27/01/2020 रोजी मयत सर्जेराव मुंढे हे दिवसभर पत्नी इंदुबाई, मुलगा दिलीप यांचे बरोबर शेतात होते व संध्याकाळी 6.15 वाजता घरी आले व त्यानंतर ते नेहमीप्रमाणे गावात गेले व संध्याकाळी 7.15 वाजता श्रीकांत मुंढे हे त्यांचे घराकडुन गावात येत होते. श्रीकांत मुंढे जिल्हा परिषद शाळेसमोर आले असता त्या ठिकाणाहुन महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे व बाजीराव कृष्णा मुंढे हे घाईगडबडीत त्यांचे घराकडे पळत जाताना श्रीकांत मुंढे यांनी पाहिले. श्रीकांत मुंढे जिल्हा परिषद शाळेपासुन पुढे आले असता बाबुराव सांगळे यांचे घरासमोर लाईटचे पोल शेजारी सर्जेराव मुंढे यांचे डोक्यात दगड घातलेला होता, डोक्यातून रक्त येत होते व दगड डोक्यात घातल्याने चेहरा चेमटलेला होता म्हणून श्रीकांत मुंढे हा पळत मयत सर्जेराव मुंढे यांचे घरी गेला, त्यावेळी मयताची पत्नी इंदुबाई मुंढे, मुलगा दिलीप मुंढे व सुन दिपाली हे घरी होते. श्रीकांत मुंढे यांनी सांगितले की, आरोपी महादेव मुंढे, गणेश मुंढे व बाजीराव कृष्णा मुंढे यांनी मयत सर्जेरावचे डोक्यात दगड घालुन खुन केला आहे असे सांगितले. नंतर मयताचा मुलगा दिलीप मुंढे हा आरोपीचे घरी गेला असता आरोपी घरात दिसून आले नाहीत यावरुन आरोपीनीच खुन केला आहे अशी खात्री झाली, त्यानंतर मयताची पत्नी इंदूबाई मुंढे, मुलगा दिलीप मुंढे व श्रीकांत मुंढे हे घटनास्थळी आले. पोलीस थोडयावेळातच घटनास्थळी आले व मयताचे प्रेत पांगरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. घटनेबाबत मयताची पत्नी इंदुबाई सर्जेराव मुंढे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीप्रमाणे आरोपी विरुध्द इ.पि.को.कलम 302 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व तपासिक अंमलदार प्रविण शिरसट यांनी आरोपी महादेव मुंढे, गणेश मुंढे, बाजीराव मुंढे यांना अटक केली व तपासा दरम्यान गणेश मुंढे व बाजीराव मुंढे यांचा सहभाग दिसून आला नाही म्हणून दोन्ही आरोपीविरुध्द सी.आर.पी.सी. 169 प्रमाणे रिपोर्ट दाखल केला व आरोपी महादेव बाजीराव मुंढे यांचे विरुध्द इं.पि.को.कलम 302 प्रमाणे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदरचा खुन खटला हा बार्शी बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब यांचे कोर्टात चालला. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे 17 साक्षीदार तपासले व बार्शी येथील मा. सेशन्स जज्ज व्ही.के. मांडे साहेब यांनी आरोपी महादेव मुंढे यांना इं.पि.को.कलम 302 मध्ये दोषी ठरवून जन्मठेव व रक्कम रुपये 3000/- दंडाची शिक्षा सुनावली. त्या शिक्षेविरुध्द आरोपी महादेव मुंढे यांनी मा.ना.हायकोर्ट मुंबई खंडपीठ कोल्हापूर येथे ॲङ सुभाष जाधवर, ॲङ तेजस सुभाष जाधवर यांचेतर्फे अपिल दाखल केले.
सदरचे अपिलाची सुनावणी मा.ना. आ.जी. अवचट व मा.ना. अजित कडेठाणकर साहेब यांचे समोर झाली व त्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकिल सुभाष जाधवर यांनी युक्तीवाद केला की, फिर्यादी इंदुबाई मुंढे ही प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार नाही तसेच श्रीकांत मुंढे यांचे जबाबावरुन तो प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार नाही. तसेच फिर्यादी पक्षाने साक्षीदार सुनिल सानप यांचा पुरावा नोंदवलेला आहे. सुनिल सानप यांनी घटना पाहिली व आरोपी महादेव मुंढे यांनी सर्जेराव यांना खाली पाडले व मोठा दगड उचलून त्यांचे डोक्यात मारला असे सांगितले परंतु आरोपीतर्फे ॲङ सुभाष जाधवर यांनी उलटतपास घेतला त्यावेळी घटना दि. 29/1/2020 पर्यंत कोणाला सांगितली नाही तसेच मयताचे कपडे दि. 28/1/2020 रोजी पोलिसांनी जप्त केले त्यावेळी पंच म्हणुन सुनिल सानप हजर होते, त्यावेळी ही घटना पोलिसांनी सांगितली नाही तसेच घटनेदिवशी घटना मुलीला किंवा जावई यांना सांगितली नाही. जखमीस मदत करणेचा प्रयत्न केला नाही. यावरुन सुनिल सानप हे प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार नाहीत तसेच साक्षीदार आप्पाराव मुंढे यांना आरोपी महादेवने घटनेनंतर फोन करुन सर्जेराव मुंढे यांचे डोक्यात दगड घालून ठार मारले आहे असे सांगितले व आप्पाराव मुंढे यांनीही साक्ष देताना उलटतपासात सदरची घटना पोलिसांनी दि. 29/01/2020 रोजी जबाब नोंदविणे पर्यंत कोणालाही सांगितले नाही हे कबुल केले त्यावरुन त्या साक्षीदारावर विश्वास ठेवता येत नाही सुनिल सानप व आप्पाराव मुंढे हे Posed साक्षीदार आहेत. हा आरोपीचे वकिलांनी केलेला युक्तीवाद मान्य करुन आरोपीला दिलेला शिक्षा निलंबीत (ससपेंड) केली व आरोपीस जामिनवर सोडणेचे आदेश मा.हायकोर्ट मुंबई खंडपीठ कोल्हापूरचे न्यायमुर्ती मा.ना.आर.जी. अवचट व मा.ना. अजित कडेठाणकर साहेब यांनी केले. या प्रकरणी आरोपी महादेव मुंढे यांचेतर्फे ॲङ सुभाष जाधवर व ॲङ तेजस जाधवर यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल ॲड. नाईक यांनी काम पाहिले.



