DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर : गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या A S Traders and Developers LLP ची उपकंपनी Tradewings Solutions Limited चा फरार संचालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) सांगली येथे सापळा रचून संतोष नंदकुमार कुंभार (वय ४१, दत्त नगर पलूस , जि. सांगली) याला २४ फेब्रुवारी रोजी अटक केली.
या प्रकरणी गुन्हा र.नं. 917/2022 अन्वये भा.दं.वि. कलम 406, 409, 420, 120(ब) 201 सह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा 1999 3,4व 8 कलम अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत एकूण 20 आरोपींना अटक करण्यात आली असून काहींवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र संतोष कुंभार हा तब्बल 3 वर्षे 2 महिने 27 दिवस फरार होता.
गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारून ठरलेला परतावा न देता आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत सांगलीत कारवाई केली.
या कारवाईमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे.



