DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी मिलिंद इंगळे
अकोला : अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या घटनेत काही नागरिक व पोलीस किरकोळ जखमी झाले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
भारताने टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन हरिहर पेठेतील गाडगे नगर व सोनटक्के प्लॉट परिसरात रविवारी रात्री सुमारे पावणेअकराच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, या भागात दोन गटांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके फोडण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन ते तीन नागरिक तसेच काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी झालेल्या सारंग गीते या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दगडफेकीदरम्यान परिसरातील दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचेही समोर आले आहे. या घटनेचे काही सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरसीपी पथकासह स्थानिक पोलिसांनी दोन्ही गटांतील नागरिकांना वेगळे करत परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे.
याबाबत अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी सांगितले की, घटनेशी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून सहभागी असलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणी दोषींना शोधण्यासाठी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिसरात सध्या मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
गाडेगनगर, सोनटक्के प्लॉट परिसरात दोन गटात वाद झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. काही लोकांना ताब्यात घेतले आहे. पूर्ण परिसरात शांतता आहे. पेट्रोलिंग वाढवली आहे.



