🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
जुन्नर :- पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे तसेच चोरीस गेलेली बोलेरो जीपसह एकूण 14 लाख 87 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील 20 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जुन्नर उपविभागातील पोलीस तसेच आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी व डिंगोरे येथील नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आली.
चोरीच्या बोलेरोचा माग काढताना आरोपी सापडले
लोणी प्रवरा (जि. अहिल्यानगर) येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप (MH-17-AJ-3075) 12 जुलै रोजी कोळवाडी (ता. जुन्नर) येथे दिसून आली. वाहनाचा शोध घेत असलेल्या विघ्नेश सुभाष घोलप यांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. त्यांनी “चोर-चोर” अशी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले. झटापटीत दोन आरोपींना नागरिकांनी पकडले, तर चार आरोपी डोंगराच्या दिशेने पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागरिकांच्या मदतीने सुमारे सहा तास डोंगर-दऱ्यांमध्ये शोधमोहीम राबवून उर्वरित चार आरोपींनाही ताब्यात घेतले.
आरोपींकडून 20 गुन्ह्यांची कबुली
अटकेत घेतलेल्या सहा आरोपींकडे सखोल चौकशी केली असता महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोड्या आणि 2 वाहनचोरी असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच या टोळीतील सदस्यांविरुद्ध यापूर्वी विविध राज्यांमध्ये 50 हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
अटक आरोपी
सोनूसिंग कापूरसिंग टाक (रा. हडपसर, पुणे)
जिलूसिंग शेरसिंग दुधानी (रा. खोपोली, रायगड)
करणसिंग गगनसिंग टाक (रा. परभणी)
पंकजसिंग कालुसिंग शिकलगार उर्फ दुधानी (रा. अंबरनाथ)
पापीसिंग उर्फ कृष्णसिंग साहेबसिंग टाक (रा. परभणी)
मंगलसिंग मायासिंग दुधानी (रा. परभणी)
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जुन्नर पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्यासह ओतूर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा व जुन्नर उपविभागातील पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.



