🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतीनिधी- राजेंद्र पवार
मिरज : शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरीस गेलेल्या दोन म्ह
शी आणि एका रेडकाचा शोध घेण्यात मिरज शहर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीचा छडा लावला असून, संशयित आरोपीचा शोध सुरू आहे.
मिरज शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसवराज शिवाजी तुरतुरे (वय ३२, व्यवसाय शेती, रा. नंदिवेस पाटील गल्ली, मिरज) यांच्या राजीव गांधी नगर, ढवळी रस्ता, मिरज येथील गोठ्यातून दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० ते १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दोन हरियाणा मुरा जातीच्या म्हशी व एक रेडकू चोरी करून नेले होते.
चोरीस गेलेल्या जनावरांची अंदाजे किंमत २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तात्काळ तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीस गेलेल्या म्हशींचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान चोरीची जनावरे कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावामध्ये नेण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने रवाना झाले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने चोरीची जनावरे सोडून पलायन केले. पोलिसांनी चोरीस गेलेल्या दोन म्हशी व एका रेडकासह जनावरे ताब्यात घेतली असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस उपनिरीक्षक, तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.शेतकऱ्यांसाठी पशुधन हे केवळ जनावर नसून त्यांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. चोरीस गेलेल्या जनावरांचा तातडीने शोध घेऊन त्यांना पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात देण्याच्या पोलिसांच्या कामगिरीबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी मिरज शहर पोलिसांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.
दरम्यान, आरोपीचा शोध सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलिसांकडून सुरू आहे.



