जळगाव प्रतिनिधी : उमेश महाजन
जळगाव : मोबाईलच्या कारणावरुन धारदार चाकू सारख्या शस्त्राने वार करुन अक्षय अजय चव्हाण (वय-२३, रा. मढी चौक, पिंप्राळा) या तरुणाचा खून करणार्या संशयित निलेश उर्फ बाळा प्रवीण पवार रा. रिंगरोड याच्या शिरसोलीच्या जंगलातून पोलिसांना मुसक्या आवळण्यात सोमवारी यश आले.
वापरण्यासाठी दिलेला मोबाईल खराब करुन तो परत न केल्याच्या कारणावरुन अक्षय चव्हाण या तरुणाचा धारदार चाकूसारख्या शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शैलेश चव्हाण याच्या फिर्यादीवरुन निलेश उर्फ बाळा प्रवीण पवार (मूळ रा. कुसुंबे ता.रावेर ह. मु. रिंगरोड) व अमरसिंग ओंकार चव्हाण (वय-३०, रा. नंदनवन कॉलनी) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खूनाची घटना घडल्यानंतर मुख्य संशयित निलेश उर्फ बाळा पवार हा मुक्ताईनगला पळून गेला. त्यानंतर त्याचा शोधार्थ रवाना झालेले जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख व किशोर पवार यांचे संयुक्त पथक तयार करीत संशयिताच्या शोधात रवाना केले होते. या पथकाने रावेर, पहूर याठिकाणी संशयिताचा शोध घेतला. परंतु तो पोलिसांना चकवा देत पळून गेला.
शिरसोलीच्या जंगलातून आवळल्या मुसक्या
संशयित निलेश उर्फ बाळा हा शिरसोली जवळील जंगलात लपूस बसला असल्याची माहिती पोहेकॉ जितेंद्र राठोड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सपोनि अमोल मोरे, पोउनि दीपक जगदाळे, सपो. अतुल वंजारी, समाधान तहाकडे, शुद्धोधन ढवळे, किशोर पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी यांच्यासह जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, सलीम तडवी, योगेश साबळे, जुबेर तडवी, अमित मराठे, समाधान पाटील यांच्या पथकाने संशयित पळून जाण्यापुर्वीच मुसक्या आवळल्या.



