फरार नोकर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात
जळगाव प्रतिनिधी – भुवनेश दुसाने
घर मालक कुटुंबासह बाहेर फिरायला गेल्याची संधी साधत नोकराने घरातील कपाटे व लॉकर्स ग्राइंडरच्या सहाय्याने कापून घरातील सोने, चांदींच्या दागिण्यांसह तब्बल 50 लाख 74 हजार 576 रुपयांचा ऐवज लांबवून बिहार मधील मुळ गावी पळून जात असतांना येथील रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची कारवाई रविवारी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश गांधी (रा. मधु पार्क मेहफिल व्हिला, 102 खार (पश्चिम) मुंबई) यांच्या घरी मागील 3-4 वर्षांपासून राहुल रचन कामत (वय वर्षे 25, रा. गाव मरनैया पोस्ट कुमराखात, लडनिया, मधुबनी, लडनिया बिहार) हा कामाला होता. मात्र गांधी परिवार कुुटुंबासह फिरण्यासाठी गेल्याची संधी साधत राहुल याने घरातील कपाटे व लॉकर ग्राइंडरने ने कापून त्यातील सोने, चांदी व रोख रक्कम चोरून बॅग भरून मुंबई मधून पसार झाला.
संशय येवू नये म्हणुन तो मुंबई वरुन सुरत, तेथून उधना व उधना येथून गाडी क्र.22564 उधना-जयनगर अंत्योदय एक्स्प्रेसमधून भुसावळ मार्गे गावाकडे रवाना होत होता. मात्र गांधी यांनी घरातून चोरी झाल्याबाबात खार पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली होती. याबाबत खार पोलिसांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून आरोपी राहुल चा फोटो व घटनेबाबत माहिती दिली होती.
त्यानुसार येथील आरपीएचचे इंस्पेक्टर आर. के. मीना, इन्स्पेक्टर सचिन इंगवले यांना संशयित आरोपीचा फोटो असलेला मेसेज आला व मोबाईल ट्रेसनुसार, तो गाडी क्र. 22564 डाऊन गाडीने जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती मिळताच येथील लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी दुपारी 1:50 वाजता गाडी क्र. 22564 डाउन उधना जयनगर अंत्येदय एक्स्प्रेस भुसावळ स्थानकात फलाट क्र. 5 वर आल्यानंतर त्यांच्या पथकाचे उपनिरीक्षक ए. के. तिवारी, सहायक उपनिरीक्षक प्रेम चौधरी, कॉ. योगेश पाटील, कॉ. इम्रान खान यांच्यासह पथकाने गाडीत संशयिताचा शोध घेतला.
त्याच वेळी लोहमार्गचे पो.नि. विजय घेराडे यांनी कर्मचार्यांसह येऊन सदर गाडीची संयुक्तपणे तपासणी केली. तपासादरम्यान सहायक उपनिरीक्षक प्रेम चौधरी आणि निरीक्षक आर. के. मीना यांना मागील जनरल डब्यात एक संशयित व्यक्ती दिसली. चौकशी केल्यावर त्याच्या चेहर्यावरील सुरकुत्यावरून समजले की तो काहीतरी लपवत आहे. संशयावरून त्याला त्याच्याकडील दोन बॅग काढून अधिकारी व कर्मचार्यांसह पोलिस चौकीत आणले. याबाबतची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त क्षितिज गुरव, यांना दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. के. मीना यांनी दोन पंचांना बोलावून व महालकर ज्वेलर्सचे अतुल महालकर व लोहमार्गचे निरीक्षक विजय घेरडे त्यांच्यासमोर पकडलेल्या व्यक्तीशी चौकशी केली असता. त्याने घटनेची माहिती दिली.त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या 2 बॅगची झडती घेतली असता निळ्या बॅगमध्ये 33 तोळे सोन्याचे दागिने 42 लाख 72 हजार 648 रुपये, 1 चांदीचे ताट आणि चांदीचे डाग असलेले वजन अंदाजे 1883 ग्रॅम, किंमत 1 लाख 5 हजार227 रुपये, रोख 3 लाख 82 हजार 100 व 51 हजार रुपयांचे तीन मोबाईल., विविध देशांच्या भारतीय चलनानुसार एकूण किंमत 1 लाख 32 हजार 401 रुपये व कटर मशीन (ग्राइंडर) ची किंमत अंदाजे 1हजार 200 रुपये असा एकूण 50 लाख 74 हजार 576 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
या मुद्देमालाचा पंचासंह पंचनामा करुन खार (पश्चिम) पोलीस स्टेशन मुंबईचे उपनिरीक्षक हनुमंत कुंभारे कर्मचार्यांसह आरपीएफ पोस्ट भुसावळ स्टेशनवर हजर झाले असता त्यांच्याकडे सोपविण्यात आला. याबाबत खार (पश्चिम) पोलिस ठाण्यात गुरनं.1091/2022, भादंवि. 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



